कुस्तीपटू अंतिम पंघालवर शिस्तभंगाचा आरोप, पॅरीस सोडण्याचे आदेश
वाढलेल्या वजनामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधून विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले. विनेशचं प्रकरण ताजं असतानाच, आता पैलवान अंतिम पंघाल (Antim Panghal) अडचणींत सापडली आहे. अंतिमनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 53 किलो वजनी कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. याच गटातून कुस्तीपटू विनेश फोगाट खेळत होती. महिला कुस्तीपटू अंतिम आणि तिच्या बहिणीची पॅरिसमधून हकालपट्टी करण्यात येणार आहे. अंतिमने ज्या गावात सामना सुरू होता, तिथून आपलं काही सामान आणण्यासाठी स्वतःचं अधिकृत ओळखपत्र तिच्या छोट्या बहिणीला दिलं आणि सुरक्षारक्षकांनी तिला पकडलं. अशा परिस्थितीत फ्रेंच अधिकाऱ्यांकडून शिस्तभंगाचा आरोप झाल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. अखेर भारतीय कुस्तीपटू अंतिम, तिची लहान बहिण आणि सपोर्ट स्टाफची रवानगी पुन्हा भारतात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.