पश्चिम उपनगरातील रुग्णालय, प्रसुतिगृह पुनर्विकासाची कामे वेगाने करण्यासाठी प्राधान्य द्यावे – डॉ. विपिन शर्मा
मुंबई, दि ५
पश्चिम उपनगरातील नागरिकांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सुविधा नजीकच्या भागात उपलब्ध व्हाव्यात, याअनुषंगाने रुग्णालय आणि प्रसुतिगृह पुनर्विकास प्रकल्पांची कामे वेगाने करावीत, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे सुरु असणारा ३२५ रुग्णशय्या क्षमतेच्या सुपरस्पेशालिटी प्रकल्पाचे काम वेगाने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी आज (दिनांक ५ मे २०२६) स्थळभेटी दरम्यान दिल्या. तसेच ओशिवरा प्रसुतिगृहाच्या १५० रुग्णशय्येच्या क्षमताविकासाचे काम वेगाने करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
यावेळी प्रमुख वैद्यकीय अधीक्षक श्री. चंद्रकांत पवार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. रुग्णालयाशी संबंधित प्रयोगशाळांसाठी NABH मानांकन मिळवण्यासाठीच्या आवश्यक बाबींचा आढावा घेण्यात यावा. रुग्णालयातील अतिदक्षता विभाग, बाह्यरुग्ण विभाग, शस्त्रक्रियागृह, रुग्ण कक्ष याठिकाणी भेट देत डॉ. विपिन शर्मा यांनी रुग्णांशी संवाद साधला. रुग्णालयाच्या यंत्रणेवर वाढणारा ताण पाहता, रुग्णालय इमारतीचे अतिरिक्त मजले वाढवण्याच्या दृष्टीने योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ. विपिन शर्मा यांनी इमारत रुग्णालय पायाभूत सुविधा कक्षाला दिले. सद्यस्थितीला रुग्णालयाची क्षमता ४४४ रुग्णशय्या इतकी आहे. रुग्णालयाच्या माध्यमातून पश्चिम उपनगरातील साधारणपणे ३० लाख ते ४० लाख इतक्या लोकसंख्येसाठी या रुग्णालयाच्या माध्यमातून सेवा देण्यात येते.
नव्याने उभारण्यात येणाऱया सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या माध्यमातून ३२५ रुग्णशय्या क्षमतावाढ निर्माण करण्यात येत आहे. याठिकाणी कर्करोग, ह्दयरोग, मज्जातंतू विभाग, यकृत व मूत्रपिंड विभाग यांचा समावेश आहे. सदर इमारतीच्या अकरा मजली इमारतीपैकी ९ मजले बांधकाम पूर्ण झाले आहे. धर्मशाळेच्या इमारतीचे क्षमतावाढ करण्याचे निर्देश डॉ. विपिन शर्मा यांनी दिले.
गोरेगाव येथील ३० रुग्णशय्या क्षमतेच्या टोपीवाला मॅटर्निटी होम येथे डॉ. विपिन शर्मा यांनी भेट दिली. याठिकाणी रुग्णांना देण्यात येणाऱया सुविधांचा आढावा घेतला. तसेच रुग्णांशीही संवाद साधला. यावेळी पुनर्विकासाच्या कामाचा आढावादेखील त्यांनी घेतला. तसेच ओशिवरा प्रसुतिगृह येथील क्षमतावाढीच्या प्रकल्पाच्या कामाची माहितीदेखील डॉ. विपिन शर्मा यांनी घेतली. याठिकाणी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत १५० रुग्णशय्या क्षमतेच्या प्रसुतिगृहाचा विकास हाती घेण्यात आला आहे. या कामांची जलदगतीने पूर्तता करण्यासाठी निर्देश त्यांनी यावेळी दिले.KK/ML/MS