कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विशेष मदत करण्याच्या मुद्यावर विधान परिषदेत गदारोळ
मुंबई दि २८– कांदा उत्पादकांना मदत करण्यास राज्य सरकार तयार असून कांद्याची खरेदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार सगळ्या प्रकारच्या उपाययोजना करत आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितलं. मात्र विरोधकांनी यावरून गदारोळ केला आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
राज्य सरकारने २०१७-१८ साली ज्या पद्धतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली तशीच मदत आता करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
विधानपरिषदेत कांद्याचा हा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला, त्यावर सरकारची बाजू मांडताना फडणवीस बोलत होते. नाफेडकडून सर्व प्रकारच्या कांद्याची खरेदी सुरू झाली आहे, शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करण्यासाठी कृषी विभागामार्फत बाजार हस्तक्षेप योजनाही सरकार सुरू करत आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कांदा बाजारपेठेवर मर्यादा आल्यामुळे कांदा उत्पादक शेतकाऱ्यांवर मोठं संकट आलं आहे ही वस्तुस्थिती आहे मात्र सरकार या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना सर्वोतोपरी मदतीची सरकारची मानसिकता आहे असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
त्यापूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत कांदा आणि कापूस उत्पादकांप्रमाणेच धान, हरभरा आणि द्राक्ष उत्पादकांची स्थिती अतिशय वाईट आहे असल्याचं सांगितलं.या उत्पादनाला भाव नाही मात्र शेतकऱ्यांकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे अशी टीका त्यांनी केली.
या शेतकऱ्यांना सरकारने आधार द्यावा अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांनी सगळं बाजूला ठेवून या मुद्द्यावर चर्चा करावी आणि सरकारने अशी मागणी केली , या मुद्द्यावर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे उपसभापती नीलम गोर्हे यांना सभागृहाचं कामकाज आधी दोन वेळा आणि मग दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.
ML/KA/SL
28 Feb. 2023