Union Budget 2022-23 : सरकार यावर्षी शेतीवर किती करणार खर्च
नवी दिल्ली, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने कृषी आणि संलग्न कामांवरील बजेटमध्ये थोडीशी वाढ केली आहे. 2021-22 मध्ये ते 1,47,764 कोटी रुपये होते, ते यावर्षी 1,51,521 कोटी रुपये झाले आहे. दुसरीकडे, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्थसंकल्पीय तरतूदीमध्ये किंचित वाढ करण्यात आली आहे. 2021-22 मध्ये यासाठी 65000 कोटींची तरतूद करण्यात आली होती, जी 2022-2023 साठी 68000 कोटी रुपये करण्यात आली आहे.
दुसरीकडे, पीक विमा योजनेसाठी 15500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सरकारने खतांसाठी अनुदान म्हणून 2022-23 मध्ये 105222 कोटी रुपये खर्चाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वस्तात खते मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मात्र, यंदाही हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारला घेता आला नाही. म्हणजेच अनुदानाची ही रक्कम खत कंपन्यांना दिली जाणार आहे. कृषी बजेटमध्ये किरकोळ वाढ करून सरकार आपल्या पाठीवर थाप देऊ शकते. 2020-21 या वर्षात कृषी आणि संलग्न क्रियाकलापांसाठीचे बजेट 134420 कोटी रुपये होते. आता सरकारने 2022-23 मध्ये शेतीवर 1,51,521 कोटी रुपये खर्च करण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
तर 2013-14 मध्ये कृषी विभागासाठी अर्थसंकल्पात केवळ 21,933.50 कोटी रुपयांची तरतूद होती. आता त्यापेक्षा तिप्पट पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहेत.
पीएम किसान योजना आणि त्याचा अर्थसंकल्प
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पहिल्या अर्थसंकल्पात 75000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. पण 2021-2022 च्या अर्थसंकल्पात सरकारने त्यात 10 हजार कोटी रुपयांची कपात करून 65000 कोटी रुपये केली होती. ज्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती.
मात्र, या कपातीमुळे काही फरक पडला नाही. कारण योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 75000 कोटी रुपये कधीच खर्च झाले नाहीत. आता सरकारने 2022-2023 या वर्षासाठी बजेटची तरतूद 68000 कोटी रुपये केली आहे.
HSR/KA/HSR/1 feb 2022