या पालिकेच्या सेंद्रीय खताला मिळाला शासकीय दर्जा

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाढत्या शहकरणामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे हा प्रश्न गंभीर झालेला असताना मीरा भाईंदर महानगरपालिकेने कचऱ्यापासून हरित सेंद्रिय खत प्रकल्प उभारून आदर्श निर्माण केला आहे. महानगरपालिकेच्या कचऱ्यापासून करत असलेल्या सेंद्रीय खतनिर्मितीला ‘हरित- महासिटी कंपोस्ट’ हा ब्रँड मिळाला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाकडून महापालिकेला हा ब्रँड प्रदान करण्यात आला. या शासकीय ब्रँडमुळे महापालिकेच्या खताला दर्जा प्राप्त झाला आहे.
शहरातून दररोज गोळा होणाऱ्या कचऱ्यातून महापालिका सेंद्रिय खताची निर्मिती करत आहे. हे खत शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या खताच्या दर्जाचे आहे, असे प्रमाणपत्र महापालिकेने शासकीय खत नियंत्रण प्रयोगशाळेतून मिळवले. त्यानंतर या खताला हरित-महासिटी कंपोस्ट हा ब्रँड मिळावा, यासाठी फेब्रुवारीत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे अर्ज केला. त्यानुसार महापालिकेला हा ब्रँड मान्य करण्यात आला.
मिरा-भाईंदर शहरातून जमा होणाऱ्या कचऱ्यावर उत्तन येथील धावगीच्या डोंगरावर सौराष्ट्र एन्वायरो या कंत्राटदाराच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाते. ओल्या कचऱ्यापासून दररोज सुमारे तीस टन सेंद्रिय खत निर्मिती केली जाते.
महापालिकेच्या कचरा प्रक्रिया निर्मिती प्रकल्पात तयार होणाऱ्या सेंद्रीय खताची कंत्राटदाराकडून विक्री केली जात आहे. या विक्रीतून मिळणारे नव्वद टक्के उत्पन्न कंत्राटदाराला व दहा टक्के उत्पन्न महापालिकेला असा करार करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रातील उद्यानांसाठी अन्य ठिकाणी लावण्यात आलेल्या झाडांसाठी हे खत कंत्राटदाराकडून विनामूल्य देण्यात येते.
SL/KA/SL