राज्यपालांनी सरकार पाडण्याची भूमिका बजावू नये
नवी दिल्ली,दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू असून त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सुनावणीच्या तिसऱ्या दिवशी आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सत्तासंघर्षात राज्यपालाची भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले. तसेच, निवडणूक आयोगाच्या निकालातही अनेक त्रुटी असल्याचा दावा केला.
सत्तासंघर्षात राज्यपालांची भूमिका
कपिल सिब्बल म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या सत्तास्थापनेत राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे. चालू असलेले सरकार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुद्दाम पाडले. सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदे राज्यपालांकडे गेले, तेव्हा राज्यपालांनी तुम्ही कोणत्या पक्षाचे आहेत, असा एक प्रश्न तरी एकनाथ शिंदेंना विचारायला हवा होता. मात्र, राज्यपालांनी तसे काहीच केले नाही. शिवसेनेचेच सरकार असताना शिवसेनेचेच आमदार सत्ता कशी काय पाडू शकता? शिवसेनेचेच आमदार अविश्वास प्रस्ताव कसे आणू शकतात?
पुढे कपिल सिब्बल म्हणाले, राज्यपालांनी नियम डावलून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. राज्यपालांनी अधिकाराचा गैरवापर केला. राज्यपालांनी दिलेला शपथविधी चुकीचा ठरला तर शिंदेंचे सरकारच जाईल. कारण आमदारावर अपात्रतेची टांगती तलवार असताना राज्यपालांनी त्यांना शपथ दिली. अशी घटना लोकशाहीत अपेक्षित नव्हती.
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी गेले तीन दिवस दिवस सत्तासंघर्ष प्रकरणात जोरदार युक्तिवाद केला. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर त्यांनी एकनाथ शिंदेंनी पक्षात राहूनच केलेले बंड, त्यानंतर शिंदेंचे भाजपसोबत जाणे, नंतर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणे हे सर्व बेकायदेशीर कृत्य होते, असा युक्तिवाद करत शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई करण्याची जोरदार मागणी केली.
अॅड. कपिल सिब्बल यांनी अडीच दिवस जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर अॅड. अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला.
आता पुढील सुनावणी मंगळवार दि.२८ रोजी होणार आहे. अॅड. अभिषेक मनु सिंघवी यांच्यानंतर अॅड. दत्ता कामत युक्तिवाद करणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. त्यानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहेत. तसेच राज्यपालांच्या वकीलांकडूनही आपली बाजू मांडण्यात येईल.
SL/KA/SL
23 Feb. 2023