जीवावर उदार होऊन कर्मचारी पेलत आहेत लसीकरणाचे इंद्रधनुष्य

गडचिरोली, ता.१६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या भामरागड तालुक्यातील आलदंडी, लष्कर, होडरी, दामनमर्का, कुव्वाकोडी, पेरमलभट्टी, फोदेवाडा, बिनागुडा अशा अनेक गावांपर्यंत पोहचण्यासाठी पावसाळ्यात नदी, नाल्यांचे अडथळे पार करुनच जावे लागते. नावेचा वापर हेच त्या भागातील नागरिकांसाठी एकमेव साधन असते. अशाही परिस्थितीत आरोग्य कर्मचारी पूर आलेल्या नदीतून नावेने प्रवास करुन मिशन इंद्रधनुष्य ५.१ मोहीम फत्ते करण्यासाठी धडपडत आहेत.

नदी, नाल्यांचे अडथळे पार करुन आरोग्य विभागाने आतापर्यंत लसीकरणाचे ८० टक्के उद्दिष्ट गाठले आहे. नियमित लसीकरणातून सुटलेली बालकं आणि गरोदर मातांचे लसीकरण करण्यासाठी शासनाने मिशन इंद्रधनुष्य ५.१ ही मोहीम सुरु केली आहे. ७ ऑगस्टला या मोहिमेचा जिल्ह्यात शुभारंभ झाला आणि दुसऱ्याच दिवशी ८ तारखेला लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन आरोग्य सेविका मोहिमेवर निघाल्या.
वाटेतील गुंडेनूर नदीला पूर आलेला परंतु पूल नसल्याने दोघींनीही नदीतून नावेने प्रवास करुन आलदंडी गाव गाठले. तेथे जाऊन त्यांनी बालकं आणि गरोदर मातांचे लसीकरण केलं.
त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत; तर त्यांनी गावातील हिवतापाच्या रुग्णांवरही औषधोपचार केले. जिवावर उदार होऊन लसीकरणाचं इंद्रधनुष्य पेलणाऱ्या या आरोग्य सेविकांना सलामच करावा लागेल.
ML/KA/SL
16 Aug 2023