मुंबईत आणखी दहा इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन

 मुंबईत आणखी दहा इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन

मुंबई दि.३०(एम एमसी न्यूज नेटवर्क): पर्यावरण संतुलन व संवर्धनासाठी विद्युत वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा भाग म्हणून मुंबईतील आणखी दहा सार्वजनिक वाहनतळांमध्ये इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) समवेत महापालिकेने करार केला आहे.

प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संतुलनासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विद्युत वाहनांच्या वापरांना प्रोत्साहन दिले जात आहे. या धोरण अंतर्गत विद्युत वाहनांची निर्मिती, त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा यांनादेखील प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामध्ये योगदान म्हणून महापालिकेने मुंबईत ठिकठिकाणी विद्युत वाहने ऊर्जा भारीत अर्थात चार्जिंग करण्याची सुविधा उभारणीला बळकटी दिली आहे. विशेषतः महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये देखील इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन निर्मिती केली जात आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) च्या वतीने महानगरपालिकेच्या दहा वाहनतळांमध्ये चार्जिंग स्टेशन निर्मिती केली जाणार आहे.
या करारानुसार, महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये एचपीसीएल यांना चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी जागा पुरवली जाणार आहे. त्यासाठी महापालिका प्रारंभीची वर्षे भाडे आकारणार नाही. तथापि, एचपीसीएलच्या वतीने प्रति वीज युनिट एक रुपया दराने महापालिकेला रक्कम देण्यात येईल. तसेच या चार्जिंग स्टेशनवर विद्युत वाहने चार्जिंसाठी एचपीसीएलकडून वाजवी दर आकारले जाणार आहेत. प्रत्येक स्टेशनवर सरासरी दोन पॉईट पुरवले जाणार आहेत, म्हणजेच दोन वाहने चार्ज करता येतील. वाहनतळांची ठिकाणे, त्यांच्या गरजा यानुसार या सर्व बाबींना अंतिम रुप दिले जाणार आहे.

केंद्र सरकारच्या धोरणानुसार, २०३० पासून भारतात विक्री केली जाणारी प्रत्येक मोटारकार इलेक्ट्रिक असेल. इलेक्ट्रिक कार जीवाश्म इंधनाऐवजी पर्यायी इंधन म्हणून वीज वापरते. पारंपरिक वाहनांचे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर केल्यास प्रतिवर्षी सुमारे १०० अब्ज डॉलर किमतीच्या जीवाश्म इंधनाची बचत होऊ शकते. ज्यामुळे देशाचे मौल्यवान परकीय चलन वाचेल आणि शहरांमधील प्रदूषण कमी करता येवू शकेल. विद्युत वाहने विक्रीचा हिस्सा ३० टक्के खासगी कारसाठी, ७० टक्के व्यावसायिक वाहनांसाठी आणि ८० टक्के दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी असावा, असा सरकारचा प्रयत्न आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, स्थानिक स्वराज्य संस्थांना आणि इतरही सर्व संबंधित प्राधिकरणांना आपापली भूमिका निभवावी लागेल. त्यादिशेने प्रयत्न करताना वित्तीय व्यवस्थापन, वित्तीय व्यवहार्यता शोधून सुयोग्य वित्तीय पद्धती व पायाभूत सुविधा यांची अंमलबजावणी करावी लागेल. त्यादृष्टीने आजच्या कराराला विशेष महत्त्व आहे, असे सांगून सौर ऊर्जा आणि इतर नवीन ऊर्जा स्त्रोतांच्या वापरावर देखील महापालिका आगामी काळात भर देणार आहे

येथे असेल चार्जिंग स्टेशन

१) एच. पी. पेट्रोल पंपाजवळील रुणवाल अँथोरियम, लालबहादूर शास्त्री मार्ग, मुलुंड (पश्चिम)

२) डॉ. आनंदराव नायर मार्ग, जेकब सर्कल, भायखळा

३) अपोलो मील कंपाऊंड, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ

४) कल्पतरू एव्हाना इमारत, जनरल नागेश मार्ग, एम.जी. एम. हॉस्पिटलजवळ, परळ-शिवडी

५) ग. द. आंबेकर मार्ग, काळाचौकी

६) हिल रोड व आइस फॅक्टरी लेन यांच्या जंक्शनवर, वांद्रे (पश्चिम)

७) वसंत ओऍसिसजवळ, मरोळ गांव, अंधेरी (पूर्व)

८) पहाडी गोरेगावच्या बहुमजली सार्वजनिक वाहनतळ, उमिया माता मंदिरामागे, विश्वेश्वर मार्ग, गोरेगाव (पूर्व)

९) पहाडी गोरेगाव, एस. व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम) (टोपीवाला मार्केट इमारत, गोरेगाव रेल्वे स्थानक (पश्चिम)

१०) एकसार गाव, देविदास गल्ली, (क्लब एक्वारिया), बोरिवली (पश्चिम)

ML/KA/SL
30 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *