चाळीस कोटी खर्चून दावोसला काय केलं सांगा
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दावोसला मुख्यमंत्री परदेशी गुंतवणूक आणायला खासगी विमानाने गेले होते त्यासाठी चाळीस कोटींहून अधिक खर्च आला पण प्रत्यक्षात राज्यातील कंपन्यांनीच गुंतवणूक केली, मग त्या कंपन्या परदेशी असल्याचं का दाखवलं, एव्हढा खर्च झाला त्याचा हिशेब द्या अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत ते बोलत होते. या सरकारच्या काळात एकही मोठा उद्योग राज्यात आलेला नाही , पंतप्रधान मोदी मोठे प्रकल्प राज्याला देणार होते त्याचं काय झालं असे सवाल त्यांनी उपस्थित केले. राज्यातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून नोकरभरतीचा एक कालबध्द कार्यक्रम राबवा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नेमणुका अजूनही का रखडलेल्या आहेत असाही सवाल त्यांनी केला.
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, पदवीधर आणि शिक्षकांनी सत्तारूढ पक्षाला जोरदार चपराक दिली आहे, त्यामुळे सत्तारूढ नाउमेद झाल्याची टीका अजित पवार यांनी केली. राज्यपालांनी मराठी भाषा दिनाच्या दिवशी एकही वाक्य मराठीत उच्चारले नाही , मराठी भाषेला अद्याप अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही असे सवालही पवार यांनी उपस्थित केले.
ML/KA/SL
28 Feb. 2023