जम्मू-काश्मीरमधील शाळांमध्ये राष्ट्रगीत म्हणणं बंधनकारक

जम्मू-काश्मीर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू-काश्मीर शालेय शिक्षण विभागाने केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळांमध्ये दिवसाची सुरूवात राष्ट्रगीताने करणे अनिवार्य केले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी एका परिपत्रकाद्वारे हे निर्देश दिले आहेत. देशभरातील शाळांमध्ये नियमित होणारा राष्ट्रगीत गायन उपक्रम केंद्रशासित प्रदेशातील शाळांमध्ये अवलंबला जाच नसल्याचे निदर्शनास आले आहे, असे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. विद्यार्थ्यांमध्ये एकता आणि शिस्तीची भावना वाढीस लावण्यासाठी शाळांमध्ये दिवसाची सुरूवात राष्ट्रगीताने करणे आवश्यक असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले आहे.
राष्ट्रगीत नैतिक अखंडता, सामायिक समुदाय आणि मानसिक शांतता या मूल्यांची जोपासना करण्यासाठी व्यासपीठ म्हणून काम करतात. मात्र, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील विविध शाळांमध्ये अशा प्रकारची महत्त्वपूर्ण परंपरा समानपणे पार पाडली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे. तसेच शिक्षकांना महान व्यक्ती आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या आत्मचरित्रांवर चर्चा करणे, शालेय कार्यक्रम आणि उपक्रमांविषयी दररोज घोषणा करणे आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी आणि सकारात्मक सूर लावण्यासाठी प्रेरणादायी भाषणे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या परिपत्रकानुसार, मानसिक शक्ती आणि निरोगी जीवनशैलीला चालना देण्याच्या उद्देशाने तणाव व्यवस्थापन आणि आरोग्य विषयक टिप्स, सांस्कृतिक उत्सव आणि विविध संस्कृती आणि ऐतिहासिक घटनांबद्दल जाणून घेण्याचा समावेश सकाळच्या संमेलनात केला जाईल. दयाळूपणा, वैविध्य किंवा पर्यावरण विषयक जनजागृती असे साप्ताहिक किंवा मासिक विषय सकाळच्या संमेलनात समाविष्ट करावेत, असे शालेय शिक्षण विभागाने परिपत्रकात म्हटले आहे.
सकाळच्या सभेमध्ये शाळांनी काही अतिथी वक्त्यांना आमंत्रित करणे आणि पर्यावरण आणि अंमली पदार्थांच्या समस्येविषयी जनजागृती करण्याची शिफारस ही विभागाने केली आहे. सकाळची प्रार्थना २० मिनिटे चालेल, शाळेच्या दिवसाच्या सुरुवातीला सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी निर्धारित ठिकाणी एकत्र येणे आवश्यक आहे, असे निर्देशही शाळांना देण्यात आले आहेत.
SL/ML/SL
13 June 2024