नाणेघाटात सुरू होतेय ‘डिजिटल वारसा प्रवास’

 नाणेघाटात सुरू होतेय ‘डिजिटल वारसा प्रवास’

कल्याण, दि. १३ : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, मुंबई मंडळातर्फे १८ मे रोजी नाणेघाट येथे ‘ऑडिओ गाइड टूर’ आणि ‘नाणेघाट पास ट्रान्सफॉर्मेशन’ प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. प्राचीन काळातील प्रमुख व्यापारी मार्ग असलेला नाणेघाट आता पर्यटकांना डिजिटल स्वरूपात आपला इतिहास सांगणार आहे. यामुळे ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञान घडणार आहे.

‘प्राचीन व्यापार मार्गापासून डिजिटल हेरिटेज वॉकपर्यंत’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम राबविण्यात येत आहे. १८ मे रोजी सकाळी ९ वाजता नाणेघाट येथे हा सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून टी. श्रीलक्ष्मी उपस्थित राहणार आहेत.

यावेळी विशेष निमंत्रित म्हणून डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथील सहयोगी प्राध्यापक अभिजीत दांडेकर तसेच महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमाचे संकलन अभिजीत एस. आंबेकर यांनी केले आहे. नाणेघाट हा सातवाहन काळातील अत्यंत महत्त्वाचा घाटमार्ग असून, तेथील ब्राह्मी लिपीतील कोरीव लेख आणि रांजण ऐतिहासिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचे मानले जातात.

पर्यटकांना या ऐतिहासिक स्थळाची माहिती अधिक सुलभ आणि अचूकपणे मिळावी, या उद्देशाने ही ऑडिओ गाइड सुविधा सुरू करण्यात येत आहे. हे डिजिटल पाऊल महाराष्ट्रातील पर्यटन आणि ऐतिहासिक संवर्धनासाठी मैलाचा दगड ठरणार असून, हा कार्यक्रम सर्व पर्यटकांसाठी खुला आहे. जास्तीत जास्त इतिहासप्रेमींनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन पुरातत्त्व विभागाने केले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *