रशियातील सेंट पिटर्सबर्ग विधानसभा आणि महाराष्ट्र विधानमंडळ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

 रशियातील सेंट पिटर्सबर्ग विधानसभा आणि महाराष्ट्र विधानमंडळ सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

सेंट पिटर्सबर्ग, रशिया दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशियन फेडरेशनच्या निमंत्रणानुसार महाराष्ट्र विधानमंडळाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ ५ ते ९ जून, २०२४ दरम्यान सेंट पिटर्सबर्ग (रशिया) च्या अभ्यास दौऱ्यावर असून आज दिनांक ६ जून रोजी दोन्ही विधानमंडळांमधील सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अनेक वर्षांपासूनच्या भारत-रशिया मैत्रीसंबंधांच्या दृष्टीने तसेच मुंबई-सेंट पिटर्सबर्ग सिस्टर सिटीजच्या वाटचालीतील हा सामंजस्य करार म्हणजे मानाचा तुरा ठरणार आहे. महाराष्ट्र विधानमंडळ आणि सेंट पिटर्सबर्ग विधानसभा यांच्यादृष्टीने हा सामंजस्य करार ऐतिहासिक आणि भविष्यकालीन दृढ संबंधांची ग्वाही देणारा दिशादर्शक असा आहे, अशी भावना यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि अभ्यासदौरा शिष्टमंडळाचे नेते ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली. या सामंजस्य करारावर विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि सेंट पिटर्सबर्ग विधानसभेचे अध्यक्ष अलेक्झँडर बेलस्की यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभा सदस्य अमिन पटेल आणि गिता जैन, विधानमंडळाचे सचिव-१ (कार्यभार) जितेंद्र भोळे, जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह मुंबईतील रशिया हाऊसच्या संचालिका एलिना रेमेझोव्हा, सेंट पिटर्सबर्ग विधानसभेचे सन्माननीय सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत महाराष्ट्र विधानमंडळाचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. २२ जानेवारी, १८६२ रोजी कुलाबा या आपल्या मतदारसंघात येत असलेल्या टाऊन हॉल मधील दरबार हॉलमध्ये तत्कालीन गर्व्हनर्स कौन्सिलची पहिली बैठक भरली होती. लोककल्याणाचे उद्दिष्ट्य पूर्ण करणारे कायदे, सखोल विचारमंथन आणि वाद-प्रतिवाद-सुसंवाद ही संसदीय लोकशाहीला अभिप्रेत असलेली सभागृहातील चर्चेची परंपरा याकडे उपस्थितांचे लक्ष वेधत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दोन्ही विधानमंडळांमध्ये वैचारीक आदान-प्रदान, दोन्हीकडील सन्माननीय सदस्यांच्या अभ्यासभेटी, संगीत-कला-साहित्य क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्यक्रमांचे आयोजन या सामंजस्य करारामुळे आता अधिक चांगल्याप्रकारे करता येऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला. वसुधैव कुंटुंबकम् ही भारताची आंतरराष्ट्रीय समाजाला एक सैध्दांतीक देणगी असून आजच्या या सामंजस्य करार स्वाक्षरी समारंभामुळे या संकल्पनेला नवीन झळाळी प्राप्त होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ६ जून या सुप्रसिध्द रशियन कवी पुष्किन यांच्या जयंती दिनानिमित्त विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. तसेच येत्या १२ जून रशिया डे निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याप्रसंगी बोलताना सागरतीरावर वसलेल्या सेंट पिटर्सबर्ग आणि मुंबई या दोन शहरांमध्ये सिस्टर सिटीमुळे पूर्वापार असलेले मैत्रीसंबंध आणखी दृढ होत आहेत याबद्दल आनंद व्यक्त केला. रशियाने एक सच्चा मित्र या नात्याने आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये भारताच्या भूमिकेला नेहमीच बळ दिले आहे. सुमारे ५५५ वर्षांपूर्वी भारत भेटीवर आलेले रशियन व्यापारी अफानासी निकीतीन यांचे अलिबाग जवळील रेवदंडा येथे उभारण्यात आलेले स्मारक तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा मॉस्कोतील रुदोमिनो राष्ट्रीय ग्रंथालयात समारंभपूर्वक बसविण्यात आलेला पुतळा आणि आता आजचा हा सामंजस्य करार स्वाक्षरी समारंभ यामुळे हे मैत्रीसंबंध वेगळ्या उंचीवर पोहचले आहेत. मराठीतील उत्तोमउत्तम साहित्य रशियन भाषेत अनुवादित करणाऱ्या मराठी भाषा प्रेमी आणि तज्ज्ञ डॉ. नीना क्रस्नादेम्बस्काया यांचा उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी बोलताना आवर्जून गौरव केला. महिला सशक्तीकरण, अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि विद्यार्थी विनिमय कार्यक्रम (Student Exchange Programme) या बाबींना सामंजस्य करारामुळे निर्माण झालेल्या संयुक्त मंचाद्वारे प्राधान्य दिले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सेंट पिटर्सबर्ग विधानसभेचे अध्यक्ष अलेक्झँडर बेलस्की यांनी सप्टेंबर, २०२३ मध्ये आपल्या मुंबई भेटीतील आठवणींना उजाळा दिला आणि सामंजस्य करारातील मुद्यानुसार यापुढील काळात परस्पर सर्वक्षेत्रीय संबंध आणखी दृढ होतील अशी ग्वाही दिली.

  • सेंट पिटर्सबर्ग इंटरनॅशनल इकोनॉमिक फोरमला उपस्थिती रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या प्रमुख उपस्थितीत ६ आणि ७ जून रोजी सेंट पिटर्सबर्ग इंटरनॅशनल इकोनॉमीक फोरम – २०२४ चे आयोजन करण्यात आले असून या अत्यंत महत्वाच्या परिषदेसाठी देखील या शिष्टमंडळाला निमंत्रित करण्यात आले आहे, तसेच विधानसभा ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे हे फोरमच्या व्यासपीठावर आपले विचार मांडणार आहे.

ML/ML/SL

6 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *