चेंबुरमध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; 9 जण जखमी

मुंबई दि.6(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील चेंबूर परिसरात आज (गुरुवार) सकाळी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन
यात 9 जण जखमी झाले आहे. या स्फोटात आजूबाजूची दुकाने आणि काही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.जखमींना तातडीने जवळच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा पोलीस तपास करीत आहेत.
आज सकाळी ७ च्या सुमारास सी जी गिडवाणी रोड स्मोक हिल सलूनच्या मागे गोल्फ क्लबजवळ असलेल्या एका घरात सिलेंडरचा मोठा स्फोट झाला. या घटनेत ओम लिंबाजिया (वय ९), अजय लिंबाजिया (वय ३३), पूनम लिंबाजिया (वय ३५), मेहक लिंबाजिया (वय ११), ज्योत्स्ना लिंबाजिया (वय ५३), पियुष लिंबाजिया (वय २५), नितीन लिंबाजिया (वय ५५), प्रीती लिंबाजिया (वय ३४), सुदाम शिरसाट (वय ५५) हे गंभीर जखमी झाले असून या सर्वांना सायन रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
सिलेंडरचा स्फोट झाल्यावर येथे आग लागली होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि मुंबई अग्निशमन विभागाच्या तीन फायर गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. हा स्फोट ऐवढा भीषण होता की, घराजवळील दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोटामुळे दुकानाची पडझड आणि काही गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे. स्फोटामुळे लागलेल्या आगीवर अग्निशामक दलाने नियंत्रण मिळवले आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास आर सी एफ पोलिस करत आहे.
SW/ML/SL
6 June 2024