मी कायम राष्ट्रवादीतच राहणार, प्रतिज्ञापत्र लिहून देऊ का?
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्ष सोडणार असल्याच्या वावड्या मध्ये मध्ये उठत असतात. गेल्या आठवड्यापासून राज्यभर अजित पवार हे राष्ट्रवादी सोडून भाजपात सामिल होणार, मोठा राजकीय भूकंप होणार यांसारख्या बातम्यांना उधाण आले आहे. याबाबत आज अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत आपली बाजू स्पष्ट केली. सततच्या अफवांमुळे काहीशा त्रस्त झालेल्या दादांनी, “मी कायम राष्ट्रवादीतच राहणार, प्रतिज्ञापत्र लिहून देऊ का?” असा सवाल उपस्थित करत माध्यमांसमोर आपली बाजू सडेतोडपणे मांडली.
आज मुंबईत माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “कारण नसताना माझ्याबद्दल आणि माझ्या काही सहकार्यांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचं काम जाणीपूर्वक केलं जात आहे. वास्तविक ज्या बातम्या दाखवल्या जात आहेत, यामध्ये काहीही तथ्य नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे, अलीकडेच नागपूरला महाविकास आघाडीची सभा होती, तिकडे आम्ही सगळे नेते गेलो होतो,”
अजित पवार पुढे म्हणाले, “आपण सातत्याने माझ्याबद्दल ज्या काही बातम्या पसरवत आहात किंवा दाखवत आहात, त्यामध्ये काहीही तथ्य नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांच्या सह्या घेण्याचं काहीही कारण नाही. आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार आहोत. त्यामुळे संबंधित बातम्यांना कसलाही आधार नाही. काही प्रसारमाध्यमांवर वेगवेगळ्या पक्षाचे लोकदेखील त्यांचं मत व्यक्त करत आहेत. त्यांनी काय मत व्यक्त करावं, हा त्यांचा अधिकार आहे. “साधारण मंगळवारी किंवा बुधवारी आमदारांच्या कमिटीच्या बैठका असतात. अनेक आमदार मंत्र्यांकडे किंवा मंत्रालयात कामाच्या निमित्ताने येत असतात. त्यामुळे आजही जे आमदार येथे आले होते, ते मला भेटायला आले होते. ही नेहमीची पद्धत आहे. याचा वेगळा अर्थ काढू नका. संबंधित आमदारांची वेगवेगळी कामं होती. ते आमदार त्यांची विविध कामं घेऊन मला भेटायला आले होते,”
अजित पवारांच्या या स्पष्ट भूमितकेमुळे ते पक्ष सोडणार असल्याच्या वावड्यांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
SL/KA/SL
18 April 2023