प्रसिद्ध सिनेअभिनेता सैफ अली खानवर जीवघेण्या हल्ल्या करणारा आरोपी जेरबंद

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
प्रसिद्ध सिनेअभिनेता सैफ अली खान यांच्या मुंबईतील वांद्रे येथील घरात जबरी चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या व त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. शरीफुल इस्लाम शहजाद (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा बांगलादेशातील ग्राम राजाबरीया थाना नॉलसिटी, जि झलोकाठी बांग्लादेश येथील रहिवासी आहे. त्याने भारतात बेकायदेशीर प्रवेश केल्याचेही उघड झाले.
तक्रारदार श्रीमती एलीयामा फिलीप (वय ५६, व्यवसाय: स्टाफ नर्स) यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, १६ जानेवारी रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास त्या सैफ अली खान, करीना कपूर यांचा लहान मुलगा जहांगिर (वय ४) आणि आया जुनू (वय ३०) यांच्यासह झोपलेल्या होत्या. त्याच वेळी एक अनोळखी व्यक्ती लाकडी वस्तू आणि हेक्सा ब्लेडसारख्या शस्त्रासह घरात घुसला.
आरोपीने पैशांची मागणी करत फिर्यादीसह आयावर आणि मदतीला आलेल्या सैफ अली खान यांच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात
सैफ अली खानवर सहा वार करण्यात आले होते. या घटनेत तिघांनाही गंभीर दुखापत झाली.
तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी कलम ३११, ३१२, ३३१ (४), ३३१ (४), ३३१ (६), ३३१(७) भा. न्या. स अन्वये गुन्हा दाखल केला आणि विविध तपास पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचे ठिकाण निष्पन्न करण्यात आले. तो पळून जाण्याच्या तयारीत असताना हिरानंदानी इस्टेट, घोडबंदर रोड, ठाणे येथे पोलिसांनी
शरीफुल इस्लाम शहजाद याला अटक केली.
आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता तसेच भारतात प्रवेश प्रतिबंध अधिनियम १९४८ व परकीय नागरिक आदेश १९४६ अंतर्गत गुन्ह्यांचे कलम वाढवण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांच्या विविध पथकांनी अथक परिश्रम घेऊन या संवेदनशील गुन्ह्याचा पर्दाफाश केला. या कामगिरीसाठी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक व्यक्त केले आहे.
मुंबई पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे गुन्हेगारीविरोधातील त्यांची तत्परता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
ML/ML/PGB 19 Jan 2025