या मराठी कादंबरीला ५ लाखांचा राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कार

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राची जीवनवाहिनी गोदावरी नदीवर आधारित कथानक असली आणि या गोदामाईचे अंतरंग उलगडणारी मराठीतील एक महत्त्वाची कादंबरी म्हणजे मनोज बोरगावकर लिखित नदिष्ट. मराठी वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या या वेगळ्या धाडणीच्या कादंबरीला आता राष्ट्रीय स्तरावरही बहुमान मिळाला आहे. नदीष्ट या बहुचर्चित कादंबरीला बँक ऑफ बडोदाचा पाच लाखांचा राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. यात लेखकाला 3 लाख आणि अनुवादकाला 2 लाख रुपये देऊन गौरवण्यात येईल. डॉ.गोरख थोरात यांनी नदीष्ट कादंबरीचा हिंदीमध्ये अनुवाद केला आहे.
बँक ऑफ बडोदाच्या राष्ट्रभाषा सन्मान पुरस्काराच्या अंतिम फेरीतही नदीष्ट कादंबरीने धडक मारली आहे. या फेरीत साहित्यकृतीने बाजी मारली, तर 36 लाखांच्या पुरस्काराने गौरवण्यात येईल. त्यात लेखकाला 21 लाख आणि अनुवादकाला 15 लाख रुपये देऊन सन्मान करण्यात येईल.
बँक ऑफ बडोदाच्या राष्ट्रभाषा सन्मान पुरस्कारात एकूण 61 लाखांचे पुरस्कार देण्यात येतात. त्यासाठी देशभरातील 70 अनुवादित साहित्यकृती स्पर्धेत होत्या. यातल्या 12 साहित्यकृतींना नामांकन मिळाले. त्यातल्या 6 साहित्यकृती सर्वोत्तम लेखनाच्या अंतिम फेरीत पोहचल्यात. बुकर पारितोषिक विजेत्या सुप्रसिद्ध लेखिका गीतांजली श्री, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक अरुण कमल, पुष्पेश पंत, अनामिका आणि प्रभात रंजन हे साहित्यक परीक्षक म्हणून काम पहात आहेत.
नदीष्टला आजवर अच्युतबन पुरस्कार, आपटे ग्रंथालय पुरस्कार, इचलकरंजी, कविवर्य टिळक पुरस्कार, कालिदास पुरस्कार, राय हरिश्चंद्र साहनी ‘दुःखी’पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्तम प्रौढ कादंबरी पुरस्कार या महत्तपूर्ण पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
नदीष्ट विषयी
‘नदीष्ट’ ही प्रा. मनोज बोरगावकर यांची बहुचर्चित व वाचकप्रिय ठरलेली कादंबरी 2019 साली ग्रंथाली प्रकाशनाने प्रसिद्ध केली. नदीष्ट कादंबरी सुरुवातीपासूनच प्रचंड वाचकप्रिय ठरलीय. नदी , पर्यावरण व ‘एलजीबीटी’ समूह ह्या आजच्या जागतिक स्तरावरील समस्यांवर ही कादंबरी आधारलेली आहे. निसर्ग , माणूस व त्यांचे अद्वैतभाव ती प्रकर्षाने दृग्गोचर करते. नदीष्टला आशय , विषय व रूपबंधाच्या आगळ्या-वेगळ्या मांडणीमुळे उदंड वाचक प्रेम तर लाभलेच पण राज्य शासनाचा हरी नारायण आपटे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . कन्नड , हिंदी भाषेत तीचे अनुवाद झाले अनेक भाषांमध्ये अनुवादाचे काम सुरू आहे .

मनोज बोरगावकर यांची अन्य पुस्तके
- अकथ कहाणी सद्गुणांची (ललित)
- कोरा कागद निळी शाई (कवितासंग्रह)
- नदीष्ट (कादंबरी)
- पाश्चिमात्य विचारप्रवाह
- लोकप्रशासन
- स्वातंत्र्य पूर्वकालीन राजकीय विचारप्रवाह