प्रतीक्षा बागडी पहिली महिला महाराष्ट्र केसरी
सांगली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत प्रतीक्षा बागडी हीने अंतिम लढत जिंकून पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला आहे. पुरुषांबरोबरच महिला कुस्तीला देखील प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदे तर्फे यंदा प्रथमच आयोजन करण्यात आले होते. कालपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत अनेक चुरशीच्या लढती पहायला मिळाल्या. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत आज प्रतीक्षा बागडीने वैष्णवी पाटील ला पराभूत करत पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी किताबावर आपले नाव कोरले.
स्पर्धेच्या उपांत्य लढतीत प्रतीक्षा बागडी हिने कोल्हापूरच्या अमृता पुजारीवर मात केली होती. प्रतीक्षाने 9-2 अशा गुण फरकाने अमृताचा पराभव करून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.
प्रतीक्षा बागडीची संक्षिप्त ओळख
21 वर्षांची प्रतीक्षा बागडी ही सांगलीच्या तुंग गावची रहीवासी आहे. ती वसंत कुस्ती केंद्र सांगली इथं तालिम घेते. राष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिने पदके जिंकली आहेत. खेलो इंडियामध्ये तिने रौप्य पदक जिंकलं होतं. तर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत वरिष्ठ गटात रौप्य पदकावर नाव कोरलं होतं. आता महिला महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्याने तिच्या यशाच्या खात्यामध्ये अजून एक किताब जमा झाला आहे.
SL/KA/SL
24 March 2023