’या तत्वावर गणेश मूर्तीकारांना मिळणार नि:शुल्क माती, जागा

 ’या तत्वावर गणेश मूर्तीकारांना मिळणार नि:शुल्क माती, जागा

मुंबई दि.29(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईसारख्या शहरात सण-उत्सव साजरे करतांना निसर्गचक्रास कोणतीही बाधा होणार नाही याची खबरदारी घेत यंदाचा गणेशोत्सव २०२४ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, या उद्देशाने पालिकेकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी श्रीगणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तीकारांना मोफत शाडूची माती, मंडपासाठी नि:शुल्क जागा (प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार) देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गणेशोत्सवासाठी मूर्तीकांराना देण्यात आलेली परवानगी नवरात्रोत्सवापर्यंत कायम राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. याशिवाय मूर्तीकारांसाठी एक खिडकी योजना देखील राबविण्यात येणार आहे.

मूर्तीकारांनी मंडपाकरिता अर्ज सादर करतांना मागील सलग तीन वर्षांच्या परवानगीच्या प्रती अर्जासोबत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतरच मंडपासाठी परवानगी देण्यात येईल. मूर्तीकारांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ज्यांच्याकडे सलग तीन वर्षांच्या परवानगी असतील त्यांनी यंदा नव्याने स्थानिक पोलिस व वाहतूक विभाग यांच्या ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. परंतु, मागील तीन वर्षांपैकी कोणतीही एक परवानगी नसल्यास संबंधित मूर्तीकारांना स्थानिक पोलिस, वाहतूक विभागाचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ सादर करणे बंधनकारक असेल. याशिवाय सार्वजनिक जागेवर मूर्तीकारांकडून मंडपासाठी नव्याने अर्ज आल्यास विभागीय कार्यालयाकडून त्याबाबत तपासणी करण्यात येईल. स्थानिक पोलिस स्थानक, वाहतूक विभागाचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त झाल्यानंतर मूर्तीकारांना मंडपासाठी परवानगी देण्यात येणार आहे.
पालिकेच्या मालकीच्या जागेवरील मंडपासाठी, खासगी जमीन मालकाच्या परवानगीने उभारावयाच्या मंडपासाठी यंदा कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय प्रत्येक मंडपासाठी देखील अनामत रक्कम आकारली जाणार नाही. परंतु खासगी जागेवर मंडपासाठी परवानगी मागणारे मूर्तीकार हे पारंपरिक मूर्तीकार असणे अनिवार्य आहे. अशा मूर्तीकारांना शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांपैकी कोणत्याही एकाच ठिकाणी परवानगी घेता येईल. गतवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तीकारांना प्रोत्साहन देण्यासाठी विभागस्तर उपलब्ध असलेली जागा ‘प्रथम अर्जदारास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येईल. मात्र यासाठी अर्जदार स्वत: मूर्तीकार असणे अनिवार्य आहे. तसेच सदर जागेवर मूर्तीकारांना सोयीसुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता मूर्तीकारांना विनामूल्य शाडू माती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परिमंडळीय स्तरावर उप आयुक्त यांनी ठरविलेल्या एका विभागात सुयोग्य जागा निवडून प्रति परिमंडळ १०० टन शाडू माती मूर्तीकारांना विनामूल्य उपलब्ध करून देतील. वाढीव मागणी प्राप्त झाल्यास उप आयुक्त आपल्या स्तरावर वाढीव शाडू माती खरेदी करू शकतील. मूर्तीकाराचे घर किंवा मूर्ती बनविण्याच्या जागा प्रकल्पबाधित झाल्यास अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या मूर्तीकारास नवीन ठिकाणी पूर्वी इतक्या क्षेत्रफळाची परवानगी नव्याने अर्ज प्राप्त झाल्याप्रमाणे देण्यात येईल.

मूर्तिकारांनी मंडप उभारण्यासाठी रस्ते / फूटपाथवर खड्डे खणल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मूर्तीकारांसाठी मंडपाची परवानगी देताना सदर परवानगी केवळ मूर्तीकारांसाठी असेल व परवानगीचा उपयोग मूर्तीविक्रीकरिता केला जाणार नाही, असे स्वयंघोषित हमीपत्र मूर्तीकारांना पालिकेकडे सादर करणे बंधनकारक आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १२ मे २०२० रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे मूर्तीकारांनी पालन करणे आवश्यक आहे. तसेच सदर सूचना नवरात्र व अन्य उत्सवांकरिताच्या मूर्तीकारांसाठीही लागू राहतील. मूर्तीकारांना आवश्यकतेनुसार मंडप उभारणीसाठी दिलेली परवानगी नवरात्री उत्सवापर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच मूर्तीकाराने मंडपाच्या परवानगीकरिता अर्ज करताना परिशिष्ट १ (मूर्तीकारांचे हमीपत्राचा विहित नमुना), परिशिष्ट २ (अग्नीसुरक्षेबाबत हमीपत्राचा विहित नमुना) सादर करणे बंधनकारक राहील, असे उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सवाचे समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी कळविले आहे.

SW/ML/SL

29 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *