जुन्या संसदेला निरोप, आजपासून अधिवेशन नवीन संसद भवनात

नवी दिल्ली,दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संसदेच्या विशेष अधिवेशनात आज जुन्या संसद भवनात निरोप देण्यात आला. आजपासून संसदेचं कामकाज नव्याने उभारण्यात आलेल्या संसद भवनात सुरु झाले आहे. स्वातंत्र्यप्राप्ती पासून गेली ७५ वर्ष जुन्या संसद भवनाची इमारत अनेक महत्त्वाच्या घटनांची साक्षीदार ठरली असून या वास्तूला आता ‘संविधान भवन’ असं नाव देण्याची सूचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित निरोप समारंभात केली. या वास्तूचा सन्मान कधीही कमी होता कामा नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गेल्या ७५ वर्षात विविध क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा प्रधानमंत्र्यांनी घेतला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सांगितलं की, लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या या संसद भवनाचा इतिहास प्रत्येक भारतीयासाठी गौरवास्पद आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यावेळी व्यासपीठावर होते.
या कार्यक्रमानंतर प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्व खासदार नव्या संसद भवनाकडे रवाना झाले. आणि लोकसभेचं कामकाज नव्या वास्तूतल्या सभागृहातून सुरु झालं. नवीन सभागृहात नवीन उत्साह आणि नवीन विचार घेऊन काम करु मात्र जुन्या वास्तूतल्या चांगल्या पंरपरा पुढे घेऊन जाऊ, असा विश्वास सभापती ओम बिरला यांनी व्यक्त केला. राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन नंतर नवीन वास्तूतल्या सभागृहातून सुरु झाले.
SL/KA/SL
19 Sept. 2023