पंढरपुरात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा
पंढरपूर, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार्तिकी शुद्ध एकादशी निमित्त आज पंढरपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपत्निक विठ्ठल आणि रुक्मिणीची शासकीय महापूजा केली यावेळी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे दांपत्य उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी कष्टकरीवर्ग आनंदी व्हावा राज्य सुफलाम सुफलाम व्हावे असे साकडे विठ्ठल चरणी घातले. तसेच संत नामदेव पायरी पंढरपूरचे मंदिर यांचा विकास आषाढीपूर्वी करावा यासाठी निधी कमी पडू देणार नाही. तर पंढरपूरच्या एकंदर विकासातही स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतले जाईल असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
आषाढी यात्रेनंतर पंढरपुरातील सर्वात मोठी यात्रा म्हणून कार्तिकी यात्रेकडे पाहिले जाते. या यात्रेसाठी सध्या पंढरपुरात पाच लाख भाविकांची गर्दी आहे. अशातच पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. आणि एकादशीच्या सोहळ्यास सुरुवात झाली. यानंतर मानाचा वारकऱ्याचा यथोचित सन्मान करण्यात आला. विठ्ठलाच्या शासकीय महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी संत नामदेव मंदिराला देखील भेट दिली.
कार्तिकी वारीच्या सोहळ्यासाठी संपूर्ण पंढरी नगरी ही भाविकांनी गजबजून गेली आहे. सर्वत्र हरिनामाचा जयघोष ,भगव्या पताका आणि टाळ मृदुंगाच्या होणाऱ्या गजरातून पंढरी नगरीचे सारे वातावरण हे भक्तीरसात न्हाऊन निघाले आहे.
ML/KA/SL
4 Nov. 2022