मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांचे निधन
न्यूयॉर्क, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेमध्ये सध्या टी-२० क्रिकेट विश्व स्पर्धा आयोजित करण्यात सुरु आहे. या मध्ये भारतीय संघासाठी एक दु:खद घटना घडली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MSA) अध्यक्ष अमोल काळे यांचं आज न्यूयॉर्क येथे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते अवघे 47 व्या वर्षांचे होते. अमोल काळे यांच्या निधनाने क्रिकेट वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रविवारी झालेला भारत – पाकिस्तान (Ind vs Pak) सामना पाहण्यासाठी ते न्यूयॉर्कला गेले होते. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंट इंटरनॅशनल स्टेडिअमवर त्यांनी काही फोटोही काढले. त्यांच्याबरोबर एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक आणि अपेक्स काउन्सीलचे सदस्य सूरज सामंतही होते. पण सामना संपल्यानंतर अमोल काळे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे.
अमोल काळे हे मुळचे नागपूरचे होते, नागपूरमझल्या अभ्यंकर नगर इथे ते आपल्या कुटुंबासोबत राहात होते. अमोल यांचे आई आणि वडिल दोघंही पेशाने शिक्षक होते. अमोल यांचा मुख्य व्यवसाय हा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचा होता. याशिवाय रिअल इस्टेट, वैद्यकीय, लॉजिस्टिक्स, मीडिया व्यवस्थापन, संरक्षण, ऊर्जा क्षेत्रातही कार्यरत होते. जे.के. सोल्युशन्स बरोबरच ते अर्पित एन्टरप्रायझेस या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अमोल काळे यांनी पवार-शेलार पॅनलकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. या निवडणुकीत अमोल काळे यांनी संदीप पाटील यांचा पराभव केला. एमसीएच्या अध्यक्षपदाबरोबरच अमोल काळे आंध्र प्रदेशमधल्या तिरुमला देवस्थानमचे विश्वस्तही होते.
2022 मध्ये ऑक्टोबर महिन्यात झालेल्या एमसीच्या निवडणूकीत अमोल काळे यांची अध्यक्षपदी निवड झाली. आपल्या अध्यक्षपदाच्या काळात अमोल काळे यांनी खेळाडूंसाठी अनेक मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले. मुंबईच्या वरिष्ठ खेळाडूंच्या मॅच फिमध्ये वाढ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.
SL/ML/SL
10 June 2024