चिकन ग्योझा

 चिकन ग्योझा

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

प्रत्यक्षात लागणारा वेळ: 

२५ मिनिटे

लागणारे जिन्नस: 

पारी साठी: एक दीड वाटी मैदा, थोडे मीठ व तेल पाणी भिजवायला.

फिलिन्ग साठी: चिकन खिमा एक वाटी, फ्रेश कोबी/ चायनीज कोबी/ कांद्याची पात, लसूण पाकळ्या तीन/ तिळाचे तेल किंवा साधे रिफाइन्ड तेल. कुकींग साके एक मोठा चमचा, सोया सॉस एक चमचा, चवी पुरते मीठ, ताजी कोथिंबीर. काटाकुरिको – बटाटयाचे स्टार्च किंवा आपले साधे कॉर्न स्टार्च एक दीड मोठा चमचा. बारका चमचा काळी मिरी पावडर

ग्योझे तव्यावर परतायला: एक चमचा तेल व अर्धी वाटी पाण्यात एक बारका चमचा मैदा मिसळून केलेली पातळ स्लरी.

क्रमवार पाककृती: 

आदल्या रात्री:

सर्व प्रथम भाज्या कापून घ्या. कोबी, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचे. कांद्याच्या पातीचे पण आपण नेहमी करतो तसे चिरून घ्यायचे फार मोठे तुकडे नाही ठेवायचे. लसूण पाकळ्या ठेचुन घ्या. लसूण खात नसल्यास नका घालू. कोणी सामुराई तलवार उपसून येणार नाही.

बोलमध्ये चिकन खिमा, को, को, कांपा, ल, भाज्या मिसळून घ्या, त्यात आता सर्व सिझनिन्ग घाला. मीठ, कॉर्न स्टार्च, तेल, सोया सॉस, साके घाला, एक दोन चिमूट काळी मिरी पाव्डर हे सर्व मिसळून घ्या. हलक्या हाताने कालवा. हे सर्व आता क्लिन्ग फिल्म लावुन किंवा पर्यावरणार्थ एअर टाइट डब्यात घालुन फ्रिझ मध्ये ठेवा. उद्या ग्योझे करायचे लंच मध्ये. ओव्हर नाइट राहिले पाहिजे अशी ग्योझा मास्टर ची टिप आहे.

पारीचा मैदा तेल मीठ घालुन मध्यम भिजवून घ्या. माझा डो जरा सैल झालेला. हे पण फ्रिजात टाका. १२- १८ तासाचा हा वेळ पूर्व तयारीत धरलेला नाही.

दुसृया दिवशी लंच च्या आधी:

पोळपाट लाटणे सज्ज ठेवा. तो मैदा बाहेर काढून बारक्या पुरी साइज लाटून घ्या. प्लेट मध्ये थोडा मैदा पसरुन घ्या.

एक एक पुरीत आता
एक छोटा चमचा; छोटाच घ्या ,फार भरायचे नाही नाहीतर ग्योझा फुटू शकतो; सारण भरुन आपण करंजी बंद करतो तसे बंद करायचे.
नवशिक्यांनी पुरीच्या कडांना थोडे पाणी लावुन बंद करावे सर्व ग्योझा करंज्या प्लेट मध्ये ठेवुन घ्या.

सारण फ्रिज च्या बाहेर काढल्यावर आधी चेक करा , जास्तीचे पाणी असल्यास एका वाटीत काढून घ्या. सारण जमेल तितके कोरडे हवे.
ग्योझा मास्टर पोर्क वापरून खरे तर ग्योझा करतो. ही पोर्कचीच डिश आहे मूळची चीन देशातली. हॉटेल मध्ये एकेक दिवशी १२००- १३००
पिसेस बनवले जातात. सारण बनवताना ते कोबी हाताने पिळून पिळून त्यातले जास्तीचे पाणी काढून टाकतात. बनवलेले पिसेस खाली थोडा मैदा फेकून एका ट्रे मध्ये ठेवतात. ऑर्डर आली की खटाखट परतून सर्व्ह करतात.

आता फायनल सर्व करायच्या वेळी : तवा गरम करायला ठेवा. मध्यम गरम झाले की एक चमचा तेल लावा, किंवा डोसा बनवताना कसे कांद्याने किंवा नारळाच्या शेंडीने तेल लावुन घेतात तसे करा. मग त्यात एक एक ग्योझे हलक्या हाताने ठेवा. आगगाडी बनवायची.

अर्धी वाटी पाण्यात सारणातले उरलेले पाणी, दोन तीन चिमुट मैदा मिसळून पातळ मिश्रण करुन घ्या. व गरम ग्योझे परतत असतानाच त्यावर ओता व लगेच झाकण ठेवा. हे फार महत्वाचे आहे. पाच परेन्त ग्योझे एका लायनीत तव्यात बसले पाहिजेत मग स्लरी घातली व झाकण ठेवलेले. पाच सहा मिनिटात झाकण काढा. व उलथ न्याने सर्व पाच एकदम तव्यावरून उचलून सर्विंग प्लेट मध्ये ठेवून गरम गरम सर्व्ह करा.

मूळ चायनीज पदार्थ असल्याने आपण भारतीय शेजवान चटणी बरोबर किंवा मोमो बरोबर जी तिखट चटणी येते त्या बरोबर खाउ शकतो.
भारतात रेडीमेड फ्रोझन मोमो मिळतात त्याबरोबर एक चटणी येते ती छान असते.

तयार ग्योझे जर नुसतेच इडली पात्रात उकडून घेतले तर मोमो झाले. पण ग्योझा ची स्पेशालिटी म्हणजे एक बाजु – तव्याकडची – छान भाजलेली कुरकुरीत, सोनेरी होते, रामेन/ गरम भात व चिकन तेरियाकी बरोबर पण खाउ शकतो म्हणजे फुल मील होते. इतादाकी मास.

Chicken Gyoza

ML/ML/PGB
10 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *