संविधान बदलासंदर्भातील वक्तव्यांवर मोदींनी खुलासा करावा

 संविधान बदलासंदर्भातील वक्तव्यांवर मोदींनी खुलासा करावा

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याची भाषा आरएसएस आणि भाजपामधून सातत्याने केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार विवेक देबरॉय यांनी एका लेखात संविधान बदलण्याची भाषा केली आहे. विवेक देबरॉय यांच्याप्रमाणेच भाजपच्या कृपेने राज्यसभा खासदार झालेले निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनीही संविधानाचा मूळ ढांचा बदलण्याची गरज व्यक्त केली आहे. या दोघांच्या विधानाशी भाजपा तसेच नरेंद्र मोदी सहमत आहेत का? याचा पंतप्रधानांनी तात्काळ खुलासा करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यामांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संविधान बदलाची भाषा करणाऱ्यांचा खरपूर समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान देशाला दिले आहे. या संविधानाने वंचित, मागास, दलित, अल्पसंख्याक घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले समाजातील सर्वात शेवटच्या पंक्तीतील नागरिकांना न्याय मिळेल याची तरतूद केली. सर्वांना समान हक्क, अधिकार आणि न्याय दिला परंतू संविधान न माननारे काही लोक आपल्या देशात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या परिवारातील संघटना सातत्याने संविधान बदलाची मागणी करत असतात.

भाजपाच्या जे मनात आहे तेच आज पुन्हा एकदा बाहेर आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्रजांच्या विचारांचे असे म्हणून त्यांचा अपमान करण्याचे कामही करण्यात आले. या सर्वांवर खुलासा होणे गरजेचे आहे तसेच विवेक देबरॉय आणि रंजन गोगई यांचे राजीनामे पंतप्रधानांनी घेतले पाहिजेत.

राज्यातील परिस्थिती गंभीर, राज्यपालांनी लक्ष घालावे..

राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. पाऊस नसल्याने अनेक भागात पेरण्या झाल्या नाहीत, काही भागात दुबार पेरणी करावी लागली पण पीक उगवले नाही. शेती पंपाला लागणारी वीज १२ तास देण्याची घोषणा केली पण ८ तासही वीज मिळत नाही. धानाला बोनस दिलेला नाही, कांद्याचे अनुदान मिळालेले नाही, कापूस घरातच पडून आहे. अतिवृष्टीची नुकसानभरपाईही अजून मिळालेली नाही, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत.

३६ जिल्ह्यांना १९ पालकमंत्री अशी अवस्था असल्याने प्रशासन ठप्प आहे, लोकांची कामं होत नाहीत. या परिस्थितीला राज्य सरकारच जबाबदार असून राज्यपाल यांनी यात हस्तक्षेप करावा.

राहुल गांधींना बदनाम करण्याचे प्रयत्न..

पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी भाजपा कोट्यवधी रुपये खर्च करते पण त्यांची प्रतिमा आणखीनच उजळून निघालेली आहे. राहुल गांधी यांच्या आडनावावरून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न याआधीही केला गेला आहे. जे लोक राहुल गांधींच्या आडनावाचा मुद्दा उपस्थित करतात त्यांनी जनतेच्या प्रश्नावर बोलावे, महागाई, बेरोजगारी या विषयावर बोलावे. ज्यांनी आडनावाचा प्रश्न उपस्थित केला त्यांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही.

नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचारावर बोलू नये…

‘ना खाऊंगा, ना खाने दूँगा’, म्हणणारे नरेंद्र मोदी २०१४ साली सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचार बोकाळला आहे. नोटबंदी हा मोठा घोटाळा आहे. मोदी सरकारच्या काळात किती भ्रष्टाचार झाला ते त्यांनी आधी पहावे, द्वारका एक्स्प्रेस वे महामार्ग बांधकामासाठी एक किलोमीटरला १८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असताना त्यावर २५० कोटी रुपये खर्च करण्यात आला. यावरून देशभरातील रस्त्यांच्या कामात किती कोटींचा घोटाळा झाला असेल याचा विचार करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

ML/KA/SL

17 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *