सुरक्षित प्रवासाच्या ‘ड्रीम’ साठी कोल्हापुरातील लेकी सरसावल्या

 सुरक्षित प्रवासाच्या ‘ड्रीम’ साठी कोल्हापुरातील लेकी सरसावल्या

कोल्हापूर, दि ,१७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरात सहा ठिकाणी 90 डिग्री वळण घेताना येणारी वाहनं न दिसल्यामुळे बरेच अपघात झाले आहेत. गुडघाभर खड्ड्यातून वाट काढून थकलेल्या कोल्हापुरकरांच्या सुरक्षित प्रवासासाठी कोल्हापुरातील लेकी खारीचा वाटा घेत सरसावल्या आहेत.

शहरवासियांच्या रस्ते सुरक्षेसाठी प्रशासनानं काळजी घेणं अपेक्षित असताना स्वत:साठी मिळालेल्या पाॅकेट मनीतून रस्ता 90 अंशात वळणाऱ्या ठिकाणी कॉन्वेक्स मिरर बसवण्याचं ‘ड्रीम’ घेऊन अवघ्या 5 जणींची ड्रीम टीम काम करीत आहे. या सर्व महाविद्यालयीन तरुणी असून त्यांच्या अभिनव संकल्पनेचं कौतुक करण्यात येत आहे.

याच मुलींनी समाजभान जपताना कोरोना महामारीमध्येही छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयात गरीब रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची नाष्ट्याची सोय याच ड्रीम टीमनं केली होती. कोविड दरम्यान आपल्या पॉकेटमनीमधून हा उपक्रम राबविणाऱ्या अर्पिता राऊत, श्रुती चौगुले, श्रेया चौगुले, नेहा पाटील यांच्यासह पाच तरुणींनी पुन्हा एकदा स्वखर्चातून कोल्हापुरातील वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी राबविलेला हा अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे.

कोल्हापूर शहरातील वाहतूक सुरक्षित आणि विनाअपघात व्हावी यासाठी ड्रीम टीमच्या तरुणी सरसावल्या आहेत. या तरुणींनी पॉकेट मनीमधून शहरात कॉन्वेक्स मिरर बसवले आहेत. कोल्हापूर शहरात अनेक ब्लाइंड स्पॉट्स आहेत, त्यामुळे रस्ता 90 अंशात वळणाऱ्या ठिकाणी कॉन्वेक्स मिरर बसवण्यात आले आहेत.

कोल्हापूर शहरात सुरुवातीला 6 ठिकाणी हे मिरर बसवले आहेत. त्यासाठी स्वतःच्या खर्चातील पैशात या तरुणींनी बचत केली आहे. सुरक्षेसाठी खारीचा वाटा उचलत वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सकारात्मक काम या तरुणींच्या हातून होत आहे.
कॉन्वेक्स मिरर बसवलेल्या ठिकाणी 90 डिग्रीमध्ये वळण घेताना अचानक येणारी वाहने न दिसल्यानं बरेच अपघात झाले आहेत. हे अपघात मोठे नसले, तरी यामधे कायमची शारीरिक इजा आणि आर्थिक नुकसान झालेल्यांचं प्रमाण जास्त आहे.

या उपक्रमासाठी कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर पोलिस वाहतूक शाखेकडून रीतसर परवानगी घेतली आहे. पाॅकिटमनीतून बचत करून कोल्हापूर शहरात सहा ठिकाणी मिरर बसवण्यात आले आहेत. यामधील एका मिररला सरासरी सहा हजार रुपये खर्च आहे. त्यामुळे या पाच तरुणींना कोल्हापुरकरांकडून दातृत्व लाभल्यास नक्कीच शहरात असे मिरर सर्वच आवश्यक असलेल्या ठिकाणी लावून पूर्ण होतील.

ML/KA/SL

17 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *