३.४८ कोटींच्या खर्चातून चार वर्षे बंद असलेल्या महापौर बंगल्याचे नूतनीकरण

 ३.४८ कोटींच्या खर्चातून चार वर्षे बंद असलेल्या महापौर बंगल्याचे नूतनीकरण

मुंबई, दि २८: चार वर्षांपासून बंद पडलेला आणि दुर्लक्षामुळे जीर्ण झालेला राणी बागेतील महापौरांचा हेरिटेज बंगला अखेर नूतनीकरणाच्या प्रतीक्षेतून बाहेर पडणार आहे. महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरही अधिकृत निवासस्थान उपलब्ध नसल्याने महापौर रितू तावडे यांना अद्याप घाटकोपरहून ये-जा करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने तब्बल ३ कोटी ४८ लाख रुपये खर्चून बंगल्याच्या दुरुस्ती व आधुनिकीकरणाचा प्रस्ताव तयार केला असून तो लवकरच स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

भायखळा येथील राणी बाग येथील महापौरांचा बंगला गेल्या चार वर्षांपासून वापरात नसल्याने त्याची दुरवस्था झाली आहे.
पूर्वी दादर–शिवाजी पार्क येथील महापौरांचा बंगला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी वापरण्यात आल्याने महापौरांच्या निवासाची व्यवस्था राणी बागेतील बंगल्यात करण्यात आली होती. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या कार्यकाळात त्या येथे वास्तव्यास होत्या. त्यानंतर बंगला दीर्घकाळ बंद राहिला.
महापालिकेच्या अंदाजानुसार स्थापत्य व विद्युत कामांसाठी सुमारे २.३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. टेंडर प्रक्रियेत मे. ब्युकॉन इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर्स या कंत्राटदाराने सुमारे २.३९ कोटी रुपयांचा खर्च दर्शवला आहे. जीएसटी व इतर खर्च धरून एकूण प्रकल्प खर्च ३.४८ कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. काम पूर्ण करण्यासाठी सुमारे पाच महिन्यांचा कालावधी (मार्च ते सप्टेंबर) निश्चित करण्यात आला आहे.
महापालिकेने कंत्राटदाराचा अनुभव आणि तुलनेने कमी दर लक्षात घेऊन त्याला पात्र ठरवले आहे.
महापौरांनी १ मेपासून या बंगल्यात राहण्याची इच्छा व्यक्त केली होती; मात्र दुरुस्ती उशिराने सुरू होत असल्याने त्यांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
……..
महापौरांनी सुचवलेली प्रमुख कामे
अंतर्गत फर्निचरची संपूर्ण दुरुस्ती
सर्व शौचालयांचे नूतनीकरण
पहिल्या मजल्यावर अतिरिक्त शौचालय
तळमजल्यावर अतिरिक्त बेडरूम
पारंपरिक झुंबरे व प्रकाशयोजना
सभागृहाचे बैठकीच्या खोलीत रूपांतर
अत्याधुनिक स्वयंपाकगृह
इटालियन मार्बल फ्लोअरिंग
व्हेनेशियन फिनिश
अतिरिक्त शौचालयांची उभारणी. KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *