#तात्काळ कर्ज देणार्‍या ऍप्सना मिळणार्‍या निधीची आता रिझर्व्ह बँकेकडून चौकशी

 #तात्काळ कर्ज देणार्‍या ऍप्सना मिळणार्‍या निधीची आता रिझर्व्ह बँकेकडून चौकशी

नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आता तात्काळ कर्ज देणार्‍या अ‍ॅप्सना मिळणार्‍या निधी संदर्भात माहिती घेत आहे. या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीने याबाबत माहिती दिली आहे. चुटकी वाजवताच लोकांना कर्ज देणार्‍या या अॅप्सबद्दल अशी अनेक प्रकरणे आढळली आहेत ज्यामध्ये त्यांना या अ‍ॅप्सच्या प्रतिनिधींकडून त्रास देण्यात आला आहे. अनेक प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमध्ये, ही ऍप्स कर्ज फेडीमध्ये अपयशी ठरलेल्यांकडून आपले पैसे वसूल करण्यासाठी विविध युक्त्यांचा वापर करतात, असे समोर आले आहे. बातम्यांमध्ये किमान दोन लोकांच्या आत्महत्येचीही वृत्त आली आहेत. माहिती देणार्‍या व्यक्तीच्या मते आरबीआय, या अ‍ॅप्सना काही बँका निधी पुरवत आहेत का? जर तसे असेल तर त्या बँकांनी आवश्यक ते नियम पाळले आहेत का? याचा तपास करेल.
अंमलबजावणी संचालनालयाने अशाच एका प्रकरणात सावकारीचा (मनी लाँड्रिंगचा) गुन्हा दाखल केल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या वतीने हे पाऊल उचलण्यात येत आहे. एका तात्काळ कर्ज ऍप प्रकरणी पोलिसांनीही गुन्हा दाखल केला होता, जे परदेशाशी संबंधित होते. या प्रकरणाच्या आधारे आता अंमलबजावणी संचालनालय देखील या प्रकरणाचा तपास करत आहे.
या व्यक्तीने सांगितले की निधी वापरण्याची अंतिम जबाबदारी बँका आणि आरबीआयवर आहे. या प्रकरणात, यापैकी काही अॅप्सना निधी प्रदान करण्यापूर्वी बँकांनी आवश्यक नियमांचे पालन केले आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे. जर बँकांनी नियमानुसार ‘आपला ग्राहक जाणून घ्या’ (केवायसी) मार्गदर्शक तत्त्वे लागू केली असतील तर ते ग्राहकापुरतेच मर्यादित आहे की ग्राहकांच्या ग्राहकांनाही लागू आहे हे माहिती करुन घेणे आवश्यक आहे. लाइव्हमिंटच्या एका वृत्तात आरबीआयच्या एका माजी अधिकार्‍याने हे सांगितले आहे.
सप्टेंबर महिन्यातच काही वृत्तांमध्ये दावा केला गेला होता की केंद्र सरकार काही फिनटेक अ‍ॅप्सची, त्यांचा संबंध चीनशी आहे का, या ऍप्सद्वारे डेटा आणि गोपनीयता नियमांचे उल्लंघन झाले आहे का याबाबत चौकशी करीत आहे. गेल्या वर्षी जूनमध्येच आरबीआयने म्हटले होते की बँका आणि बिगर-बँकिंग वित्त पुरवठादार, मग ते डिजिटल व्यासपीठाद्वारे कर्ज देणारे असो किंवा एखाद्या आउटसोर्स युनिटद्वारे, त्यांना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल.
तज्ञांचे म्हणणे आहे की ही ऍप्स एनबीएफसीशिवाय थेट बँकांमध्ये चालू खाते उघडून कायदेशीररित्या फसवणूक करत आहेत. कर्ज देण्यापासून ते त्याच्या वसूलीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया याच चालू खात्यातून केली जात आहे. अशा परिस्थितीत बँका मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर नजर ठेवतात की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हे व्यवहार चालू खात्यातून केले जात असल्याने, हे अ‍ॅप्स केवायसीसह सर्व नियम बाजुला ठेवून आपले काम करत आहेत आणि क्रेडिट ब्युरोलाही त्याची माहिती देत ​​नाहीत.
हैदराबाद पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की या कंपन्यांशी संबंधित बँक खाती आणि पेमेंट गेटवेद्वारे 1.40 कोटी वेळा 21,000 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. यातील बरेच व्यवहार मागील सहा महिन्यांत झाले आहेत. ही रक्कम शेल कंपन्या, एकापेक्षा जास्त बँक खाती, पेमेंट गेटवे आणि डिजिटल वॉलेट द्वारे जमा केली गेली होती जेणेकरुन यासंदर्भात माहिती मिळु नये.
 
Tag-Loan Apps/enquiry/RBI
PL/KA/PL/7 JAN 2021

mmc

Related post