#भारतीय अर्थव्यवस्थेत लवकरच सुधारणा होणार ?
नवी दिल्ली, दि.5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची घोषणा करताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी चालू आर्थिक वर्षासाठीचा (२०२०-२१) भारतीय अर्थव्यवस्थेचा अंदाज व्यक्त केला. दास यांनी सांगितले की पुढच्या तिमाहीत देशाची जीडीपी वाढ नाकारात्मक वरुन सकारात्मक होण्याची अपेक्षा आहे. आरबीआयने पुढच्या तिमाहीसाठी जीडीपी वाढीचा अंदाज वाढवून 0.10 टक्के केला आहे. त्याच वेळी, चौथ्या तिमाहीत देशाची जीडीपी वाढ 0.70 टक्के होण्याचा अंदाज आहे. मात्र संपूर्ण आर्थिक वर्षासाठीची जीडीपी वाढ -7.5 टक्के राहू शकेल.
दास यांनी सांगितले की, ‘आम्ही अर्थव्यवस्थेत पुरेशी रोख रक्कम उपलब्ध असेल याची खात्री करु, गरज पडल्यास आम्ही सर्व आवश्यक पावले उचलू. कोरोना संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत चालू आर्थिक वर्ष 2020-21 च्या दुसर्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) 7.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, याआधीचे वित्तीय वर्ष 2019-20 च्या याच तिमाहीत जीडीपी (सकल अंतर्गत उत्पादन) मध्ये 4.4 टक्क्यांनी वाढ झाली होती.
कोरोना विषाणू साथ आणि त्याच्या नियंत्रणासाठी लावण्यात आलेल्या ‘टाळेबंदी’मुळे चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जूनच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेमध्ये 23.9 टक्क्यांची घसरण झाली होती. पहिल्या तिमाहीचे पहिले दोन महिने एप्रिल आणि मे मध्ये देशात संपूर्ण टाळेबंदी होती.
अर्थ मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, अर्थव्यवस्थेत व्ही-आकाराची म्हणजेच वेगाने सुधारणा होत आहे. जून तिमाहीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जीडीपीमध्ये 23 टक्के वाढ झाली आहे. व्ही-आकाराच्या वाढीचा अर्थ कोणत्याही अर्थव्यवस्थेत वेगाने घसरण झाल्यानंतर जलदगतीने सुधारणा होणे हा आहे. अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत आहे आणि टाळेबंदी हळूहळू शिथिल केल्यानंतर ती वाढत आहे. याशिवाय ‘स्वावलंबी भारत अभियाना’ मुळे अर्थव्यवस्था सुधारणांच्या मार्गावर आहे.
Tag-Indian/Economy/GDP/RBI/Governer
PL/KA/PL/5 DEC 2020