#भारतीय अर्थव्यवस्थेत वेगाने पुनर्प्राप्ती होण्याची इंडीया रेटिंग्सची अपेक्षा
नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबरच्या तिमाहीत अर्थव्यवस्थेत अपेक्षेपेक्षा चांगली पुनर्प्राप्ती दिसून येत आहे. त्याचसोबत पतमानांकन संस्था इंडिया रेटिंग्सने आर्थिक वर्ष 2021 साठीच्या आर्थिक वाढीच्या अंदाजात सुधारणा केली आहे. इंडिया रेटिंग्सने याआधी आर्थिक विकास दर उणे 11.8 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्रा आता ते वाढवून उणे 7.8 टक्के केला आहे.
परंतु ही वाढ किती काळ चालू राहते हा यादरम्यानचा अर्थव्यवस्थेसंदर्भातला सर्वात मोठा प्रश्न आहे. कोरोना विषाणू साथीचा परिणाम झालेल्या अर्थव्यवस्थेची गती पहिल्या तिमाहीत ऐतिहासिक उणे 23.90 टक्क्यांपर्यंत घसरली होती. दुसर्या तिमाहीत ती उणे 7.5 टक्के होती.
मात्र इंडिया रेटिंग्सने आपल्या अहवालात असेही लिहिले आहे की, साथीचा त्वरित अंत होण्याची शक्यता कमी आहे आणि आर्थिक घडामोडींना सध्या यासोबतच रहावे लागेल. त्या आधारे इंडीया रेटिंग्सची अपेक्षा आहे की तिसर्या तिमाहीमध्ये जीडीपीची वाढ उणे 0.8 टक्के असेल आणि चौथ्या तिमाहीत ती 0.3 टक्के असू शकेल. याआधी अशी अपेक्षा व्यक्त होत होती की आर्थिक वर्ष 2022 च्या दुसर्या तिमाहीतच विकास सकारात्मक होऊ शकेल.
इंडिया रेटिंग्जच्या या अंदाजातील सुधारणेच्या अवघ्या एक दिवस आधी, भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या हवालात म्हटले आहे की, तिसर्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था सकारात्मक टप्प्यात येऊ शकते. या अहवालात ‘ अर्थव्यवस्थेची स्थिती’ नावाच्या एका लेखात हे सांगण्यात आले आहे. या अहवालात सांगण्यात आले आहे की अशी अनेक उदाहरणे आहेत जी भारतीय अर्थव्यवस्था कोविड-19 च्या आघातामधून वेगाने प्रगती करत असल्याचे संकेत देत आहेत. अर्थव्यवस्थेचा हा वेग बहुतांश अंदाजांपेक्षा खुपच चांगला आहे.
परंतू आरबीआयच्या या अहवालात असेही म्हटले आहे की अनेक संस्थांद्वारे वर्तवण्यात आलेल्या अंदाजांमध्येही सुधारणा केली जात आहे आणि जर हाच वेग कायम राहिला तर शेवटच्या तिमाहीत आर्थिक वाढ आणखी जबरदस्त असू शकते. असेही सांगण्यात आले की सध्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे अन्यथा यामुळे आर्थिक विकासाचे नुकसान होऊ शकते.
Tag-India/Economic Recovery/India Ratings
PL/KA/PL/26 DEC 2020