#तिसर्‍या तिमाहीत आर्थिक विकास दर सकारात्मक; रिझर्व्ह बँकेचा अंदाज

 #तिसर्‍या तिमाहीत आर्थिक विकास दर सकारात्मक; रिझर्व्ह बँकेचा अंदाज

मुंबई, दि.25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूच्या आघातानंतर भारतीय अर्थव्यवस्था बहुतांश अंदाजांपेक्षा वेगाने प्रगती करत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालात ‘अर्थव्यवस्थेची स्थिती’ या शीर्षकाच्या एका लेखात म्हटले आहे की तिसर्‍या तिमाहीत (क्यू3) अर्थव्यवस्था सकारात्मक श्रेणीत येऊ शकते. या अहवालात असे म्हटले आहे की अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यावरुन भारतीय अर्थव्यवस्था कोविड-19 च्या आघातामधून वेगाने प्रगती करत असल्याचे संकेत मिळत आहेत. अर्थव्यवस्थेचा हा वेग बहुतांश अंदाजांपेक्षा खुपच चांगला आहे.
कोरोना विषाणू साथीचा परिणाम झालेल्या अर्थव्यवस्थेची गती पहिल्या तिमाहीत ऐतिहासिक उणे 23.90 टक्क्यांपर्यंत घसरली होती. दुसर्‍या तिमाहीत ती उणे 7.5 टक्के होती. आता आरबीआय ती तिसर्‍या तिमाहीत सकारात्मक श्रेणीत येईल अशी अपेक्षा करत आहे. अनेक अहवालांचा हवाला देत आरबीआयच्या या अहवालात सांगण्यात आले आहे की तिसर्‍या तिमाहीत ती वास्तविक जीडीपी विकास दराच्या श्रेणीमध्ये येत 0.1 टक्के होऊ शकते.
यात असे म्हटले आहे की दोन अशा महत्त्वपूर्ण शक्ती आहेत, ज्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये इतक्या वेगाने सुधारणा दिसून येत आहे. पहिली म्हणजे कोविड-19 संसर्ग सप्टेंबर महिन्यापासून सातत्याने कमी होत आहे. मात्र काही वेळा त्यात तेजीही दिसून आली आहे. संसर्गाच्या आकडेवारीत घट झाल्यामुळे गुंतवणूक आणि खप वाढण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर आर्थिक प्रोत्साहनविषयक उपायदेखील अर्थव्यवस्थेतील खप वाढेल अशा पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. यात पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज (पीएमजीकेपी) वर होणार्‍या खर्चासोबतच आत्मनिर्भरता 2.0 आणि 3.0 मुळे गुंतवणूक वाढली आहे. अनेक निर्देशकांवर नजर टाकली तर 2020-21 या आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या भागात आर्थिक घडामोडींनी वेग घेतला असल्याचे दिसून येते आणि त्याचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवरही दिसून आला आहे.
आरबीआयच्या या अहवालामध्ये असेही म्हटले आहे की भारताला कोरोना विषाणू साथीची दुसरी लाट न आल्याने अर्थव्यवस्थेच्या गतीचा पाठिंबा मिळाला आहे. सुक्ष्मअर्थशास्त्र धोरण, टप्प्याटप्प्याने केलेली टाळेबंदीमधील शिथिलता आणि परिस्थिती सामान्य करण्याच्या दिशेने सततच्या वाटचालीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. मात्र आरबीआयने असेही स्पष्ट केले आहे की या अहवालात लिहिलेली मते या लेखाच्या लेखकांची आहेत आणि ही केंद्रीय बँकेची मते असणे आवश्यक नाही. त्यात म्हटले आहे की अनेक संस्थांनी व्यक्त केलेल्या अंदाजांमध्येही सुधारणा केली जात आहे आणि हाच वेग कायम राहिल्यास शेवटच्या तिमाहीत आर्थिक वाढ आणखी जबरदस्त असू शकते. असेही म्हटले आहे की सध्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे अन्यथा यामुळे आर्थिक विकासाचे नुकसान होऊ शकते.
Tag-Indian Economy/Growth Rate/Possitive/RBI
PL/KA/PL/25 DEC 2020

mmc

Related post