युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या ख्यातनाम संस्थेचा समावेश

कोलकाता, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कार्यकर्तृत्वाने विश्वविख्यात झालेल्या शांतीनिकेतनचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेले शांतीनिकेतन हे भारतातील ४१ वे वारसा स्थळ आहे.शांतीनिकेतन पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देबेंद्रनाथ टागोर यांनी 1863 मध्ये आश्रम म्हणून शांतीनिकेतनची सुरुवात केली होती. 1901 मध्ये, रवींद्रनाथ टागोर यांनी प्राचीन भारतातील गुरुकुल पद्धतीवर आधारित निवासी शाळा आणि कला केंद्रात रूपांतरित केले.टागोरांनी 1921 मध्ये येथे विश्व भारतीची स्थापना केली, ज्याला 1951 मध्ये केंद्रीय विद्यापीठ आणि राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून घोषित करण्यात आले. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या आयुष्याचा बहुतांश काळ इथेच व्यतीत केला.
शांतीनिकेतनचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले,- “भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेल्या शांतीनिकेतनचा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा मला आनंद आहे. हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. त्याचवेळी एस जयशंकर म्हणाले की, देशातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांना हीच खरी श्रद्धांजली आहे.”
‘शांतीनिकेतनचा वारसा यादीत समावेश होणे ही आपल्यासाठी आनंदाची आणि सन्मानाची बाब आहे. गेल्या 12 वर्षांत आमच्या सरकारने शांतीनिकेतनच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ केली आहे’, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.
शांतीनिकेतनचा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याच्या घोषणेनंतर विश्वभारती विद्यापीठात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या इमारती आणि परिसर रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात आला होता. प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी पारंपारिक कपडे परिधान करून रवींद्र संगीतावर नृत्य केले.
SL/KA/SL
18 Sept. 2023