नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात दिवसाच्या आत मदत

 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सात दिवसाच्या आत मदत

अहमदनगर,दि.११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी युध्दपातळीवर पंचनामे करण्यात येऊन एका आठवड्यात शेतकऱ्यांचा खात्यात मदत वितरित करण्यात येईल.” अशी ग्वाही ही मुख्यमंत्र्यांनी आज अहमदनगर मधील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी वनकुटे गावातील शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला‌. त्यांच्या अडचणी जाणून‌ घेत पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरूपात आजच उभारणी‌ करण्याचे आदेश दिले. वनकुटे मधील पडझळ‌ झालेल्या‌ २२ कुटुंबाना शबरी घरकुल योजनेमधून तात्काळ पक्के घरकुले उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या. त्यांच्यासमवेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे , जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते ‌.

पावसाने वनकुटे गावातील घरांची पडझड झाली आहे ‌. कांदा, कलिंगड, टोमॅटो, उन्हाळी भुईमूग या पिकांसह मका, कडवळ, घास ही चारा पिके जमीनदोस्त झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावाजवळील हिरामण बन्सी बर्डे, कचरू विठ्ठल वाघ यांच्या पडझड झालेल्या घरांची पाहणी केली.‌ त्यांच्याशी आस्थेवाईकपणे संवाद साधला.

त्यानंतर शेतकरी बबनराव रामभाऊ काळे, भागा पायगुडे, बबन मुसळे व बाबाजी मुसळे यांच्या शेतीमधील कांदा, मिरची यासह डाळिंब, संत्रा, आंबे, या फळपिकांच्या नुकसानीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाणी करून झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.

वनकुटे ग्रामदैवत मंदीरात शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, हे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आहे. त्यांच्या घामाची व दुःखाची जाण शासनाला आहे‌. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. सतत पाच दिवस १० मिलीमीटर पर्यंत पडणारा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून समजण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे‌.

नमो शेतकरी सन्मान योजनेत आता शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजारांची मदत देण्यात येत आहे. एक रूपयांत पीक विमा काढण्यात येत आहे ‌. नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत १० हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. यापुढेही मदत देण्यात येईल.

तातडीने पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने करावे. कांदा पीकांची सातबारा वर नोंद नसली तरी पंचनाम्यात नोंद घेऊन नुकसान भरपाई देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रशासनास दिल्या.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबातील दोघांना प्रत्येकी १० किलो गहू व तांदळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी वाटप करण्यात आले.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी ही यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

ML/KA/SL

11 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *