शिवसेनेची स्थावर मालमत्ता, पक्ष निधी आणि शाखा शिंदेंकडे सोपवा
मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना पक्षाच्या हक्काबाबत उद्धव ठाकरे यांच्यामागे लागलेला न्यायालयीन ससेमीरा काही केल्या थांबताना दिसत नाही.शिवसेना नाव आणि चिन्ह दिल्यानंतर आता पक्षाचा निधी, शिवसेना भवन आणि पक्षाच्या सर्व शाखा शिंदे गटाला देण्यात याव्यात अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे.
शिवसेनेची मालमत्ता आणि पक्षाचा निधी प्रमुखांकडे सोपवा अशी मागणी करणारी याचिका अॅडव्होकेट आशिष गिरी यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. पक्षाचा निधी आणि स्थावर मालमत्ता सध्याच्या प्रमुखांकडे देण्याची मागणी करण्यात आलीय. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल योग्य असल्याचा दावाही या याचिकेत करण्यात आला आहे. शिवसेना भवन, पक्षाचा निधी आणि पक्षाच्या सर्व शाखा शिंदे गटाकडे हस्तांतरित करण्यात याव्यात असं या याचिकेत नमुद करण्यात आलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला देण्याचा निकाल सुनावला होता. याप्रकरणी आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल योग्य असल्याचं आशिष गिरी यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे, या याचिकेबरोबरच आपल्या याचिकेवर एकत्र सुनवाणी घ्यावी अशी मागणीही गिरी यांनी केली आहे.