काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी, जीएसटीमुक्त शेती

 काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी, जीएसटीमुक्त शेती

भंडारा, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात सर्वात महत्वाचे ५ मुद्दे दिले आहेत. हा जाहीरनामा खूप विचार करुन बनवला असून बंद खोलीत नाही तर देशभरातील लाखो लोकांना भेटून तो बनवला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा खऱ्या अर्थाने ‘जन की बात’ आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, जीएसटीमुक्त शेती, स्वामिनाथन समितीच्या अहवालानुसार एमएसपीचा कायदा, ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणे, अग्निवीर योजना बंद करणार तसेच हिंदुस्थानातील गरिब महिलांना वर्षाला १ लाख रुपये देणार असल्याचे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहे.

विदर्भातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची भंडारा जिल्ह्यातील साकोलीत भव्य जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खासदार चंद्रकांत हंडारे, भंडारा गोंदिया लोकसभेचे उमेदवार डॉ. प्रशांत पाडोळे गडचिरोली चिमूरचे काँग्रेस उमेदवार ड़ॉ. नामदेव किरसन, नागपूरचे उमेदवार आ. विकास ठाकरे, चंद्रपूरच्या उमेदवार प्रतिभा धानोकर यांच्यासह विदर्भातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, एससी एसटी, आदिवासी, ओबीसी समाजाची सरकारमध्ये भागिदारी अत्यल्प आहे. जेवढी लोकसंख्या तेवढाच अधिकार त्या समाजाला मिळाला पाहिजे यासाठी काँग्रेस सरकार सत्तेत येताच जातनिहाय जनगणना आणि आर्थिक, सामाजिक सर्वेक्षण करण्याचे क्रांतीकारी काम करणार आहे. मोदी सरकारवर हल्लाबोल करत राहुल गांधी म्हणाले की, सरकार मोदींचे नाही तर अदानीचे आहे, एका अरबतीचे सरकार आहे , नरेंद्र मोदींनी १० वर्षात त्यांच्यासाठीच काम केले. आज देशातील विमानतळे, बंदरे, रस्ते, खाण, कोळसा, सौरऊर्जा सर्वकाही अदानी यांचेच झाले आहे.

नरेंद्र मोदी २४ तास धर्म, हिंदू-मुस्लीम यावरच बोलतात, एका समाजाला दुसऱ्याविरोधात लढवतात आणि तुमची संपत्ती अदानीच्या घशात घालतात. जीएसटीच्या माध्यमातून मोदी सरकारने जनतेला लुटले आहे. नरेंद्र मोदी यांनी ओबीसी, शेतकरी, छोटे व्यापारी, कामगार, गरीब, आदिवासी यांच्यासाठी काय केले? देशात सर्वात मोठा प्रश्न महागाई आणि बेरोजगारीचा आहे पण मोदी त्यावर कधीच बोलत नाहीत. कोरोना काळात गंगा नदीत हजारो मृतदेह दिसत होते पण नरेंद्र मोदी मात्र जनतेला टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, मोबाईल टॉर्च लावा असे सांगत होते. कधी ते समुद्राच्या तळात जातात , पूजा करतात, मोदींनी देशाची थट्टा चालवली आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन दिले आहे तसेच मागास, आदिवासी, ओबीसी समाजाच्या हितासाठी आर्थिक, सामाजिक सर्वेक्षणही केले जाणार आहे. याचा लाभ भंडारा जिल्ह्याला होणार असून या जिल्ह्यात एससी, एसटी, भटके विमुक्त, आदिवासी तथा ओबीसी समाजाची लोकसंख्या जास्त आहे. काँग्रेसच्या जाहिरनाम्यात शेतकरी, कामगार, तरुण, महिला , गरिबांसाठी आश्वासने दिली आहेत त्याबद्दल राहुल गांधी यांना मनापासून धन्यवाद देतो.

ML/ML/SL
13 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *