जीएसटी अधिकार्‍यांनी तोडले बनावट कंपन्यांचे जाळे

 जीएसटी अधिकार्‍यांनी तोडले बनावट कंपन्यांचे जाळे

नवी दिल्ली, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की वस्तु व सेवा कर (GST) अधिकार्‍यांनी 46 बनावट कंपन्यांचे जाळे (network of fake companies) तोडण्यात यश मिळवले आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार या जाळ्याद्वारे बनावट देयके (Fake Bills) तयार करण्याचा बेकायदेशीर व्यवसाय चालवला जात होता आणि आतापर्यंत 82.23 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवण्यात आले आहे.
अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, विस्तृत आकडेवारीच्या विश्लेषणाद्वारे पूर्व दिल्लीतील वस्तु व सेवा कर (GST) अधिकार्‍यांना या 46 बनावट कंपन्यांचे जाळे शोधून काढण्यासाठी आणि त्यांच्या बेकायदेशीर धंद्याची पाळेमुळे उखडण्यासाठी मदत मिळाली. या कंपन्या 2017 पासून कार्यरत होत्या आणि बनावट देयकांद्वारे अनेक लोकांना बनावट आयटीसीचा लाभ देण्यात आला आहे. या लोकांची ओळख पटवण्यात येत आहे. मंत्रालयाने सांगितले की, तपासात असे आढळले आहे की या कंपन्या आणि बेकायदेशीर व्यवसायाचे जाळे यावर अरविंद कुमार आणि त्याचे सहकारी यांचे नियंत्रण आहे. अरविंद कुमारला 17 जानेवारीला अटक करण्यात आली होती.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार अरविंद याचा एक खास सहकारी कमलसिंग सोलंकी यानेही बनावट देयकांच्या या रॅकेटमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली आहे. कमल याने सांगितले आहे की सुमारे 541.13 कोटी रुपयांची बनावट देयके जारी करण्यात आली असून त्यातून 82.23 कोटी रुपयांचा बनावट आयटीसी प्राप्त करण्यात आला आहे. मात्र पुढील तपासात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कमलसिंग यालाही अटक करण्यात आली आहे.
दिल्ली विभागाने चार वर्षांत पकडली 3700 कोटींची कर चुकवेगीरी
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार वस्तु व सेवा कर मध्यवर्ती कर (GST Central Tax) दिल्ली विभाग 2017 मध्ये स्थापन झाल्यापासून आतापर्यंत 3791.65 कोटी रुपयांची जीएसटी चोरी पकडण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित प्रकरणांमध्ये 21 जणांना अटकही करण्यात आली आहे.
PL/KA/PL/10 FEB 2021

mmc

Related post