मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील गोशाळांना देशी वंशाच्या गायींसाठी परिपोषण योजनेमार्फत ‘प्रति गाय- प्रति दिन ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना कायमस्वरूपी असून योजनेमुळे देशी गायींचे संगोपन तथा संवर्धन होऊन गोशाळांवरील आर्थिकभार कमी होईल असा विश्वास सरकारला वाटतो आहे .ही योजना शासनातर्फे गोसेवा आयोगाच्या मार्फत राबवली जाणार आहे .
राज्यातील गोवंश हत्येला बंदी असल्याने अनुउत्पादक, भाकड झालेल्या पशुंचा सांभाळ करणे शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना कठीण होत आहे. अशी अनुउत्पादक, भाकड झालेली जनावरे मोकाट सोडली जातात अथवा गोशाळेत पाठवली जातात. परिणामी गोशाळा, गोसदन, पांजरपोळ, गोक्षण संस्थांमध्ये अशा जनावरांची संख्या वाढत आहे. या जनावरांपासून मिळणारे उत्पन्न अत्यल्प असल्याने गोशाळांना त्यांचे संगोपन करणे आर्थिकदृष्या परवडत नाही. ह्या संस्था बळकट करण्याच्या अनुषंगाने शासनाने या संस्थाना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी सदरची योजना कायमस्वरूपी राबविली जाणार आहे.
सन २०१९ मध्ये करण्यात आलेल्या २० व्या पशुगणनेनुसार राज्यात ९३,८५,५७४ देशी गोवंशीय पशुधन आहे. एकात्मिक पाहणी योजनेच्या सन २०१८-१९ च्या अहवालानुसार देशी गायींचे प्रतिदिन प्रतिगाय दुध उत्पादन ३.४८१ लिटर आहे. देशी गायीचे दूध उत्पादन तुलनात्मकदृष्टया कमी असल्याने, देशी गोवंशीय पशुधनाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. १९ व्या पशुगणनेची तुलना करता,
२० व्या पशुगणनेमध्ये देशी गोवंशीय पशुधनाची संख्या २०.६९ टक्क्यांनी कमी झाली आहे.
सध्या राज्यात ८२८ नोंदणीकृत गोशाळा असून त्यात अंदाजे दीड लाखाच्यावर पशुधन आहे. गोशाळांनी देशी गाईचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी परिपोषण आवश्यक असल्याने मागणी केलेली आहे. त्या अनुषंगाने या गोष्टीचा विचार करुन याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने सोमवारी संमत केला आहे.
सदर योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे संस्थेची नोंदणी असणे आवश्यक आहे. सर्व जनावरांचे भारत पशुधन प्रणालीवर इयर टॅगींग करणे अनिवार्य आहे. योजनेसाठी गोसेवा आयोगाकडून ऑनलाइन अर्ज मागविले जाणार आहेत.गोसेवा आयोगाकडील अर्जाची पडताळणी ही जिल्हा गोशाळा पडताळणी समितीच्या वतीने केली जाणार आहे. त्यानंतर पात्र संस्थेला त्यांच्याकडे असेलेल्या पशुधनानुसार सरळ खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत.
ML/ML/PGB
30 Sep 2024