अर्थव्यवस्थेची भरारी, परकीय चलनाचा साठा प्रथमच 650 अब्ज डॉलरच्या पार
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RBI च्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आता मोठ्या प्रमाणावर प्रगती करत आहे. RBI ने काही दिवसांपूर्वीच मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली आहे.RBI ने ब्रिटनमधून 100 टनांहून अधिक सोने आपल्या देशातील राखीव ठेवींमध्ये हस्तांतरित केले आहे. त्यानंतर आता देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीच्या आघाडीवरही नवा विक्रम नोंदवला गेला आहे. 31 मे रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा 4.84 अब्ज डॉलरने वाढून 651.5 अब्ज इतका सर्वकालीन विक्रम झाला आहे. तसेच, गेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा 2.03 अब्ज डॉलरने घसरून 646.7 अब्ज झाला होता.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, हे एक मोठे यश आहे. यापूर्वी 17 मे रोजी परकीय चलनाच्या साठ्याची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 648.7 अब्ज डॉलर होती. परकीय चलनाचा साठा हा अर्थव्यवस्थाच्या एकूण सामर्थ्याचे प्रतिनिधीत्व करण्याच्या प्रमुख घटकांपैकी एक मानला जातो.
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार 31 मे रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठ्याचा सर्वात मोठा समर्थक असलेल्या परकीय चलन मालमत्ता 5.1 अब्ज डॉलरने प्रचंड वाढून 572.6 बिलियनवर पोहोचली. तसेच, या कालावधीत सोन्याचा साठा 212 दशलक्ष डॉलरने कमी होऊन 56.5 अब्ज डॉलर झाला. स्पेशल ड्रॉइंग राइट्स (SDR) 17 दशलक्ष डॉलरने कमी झाले आणि 18.12 बिलियन डॉलरवर आले. तसेच याच कालावधीत आयएमएफ कडील राखीव निधी 1 दशलक्ष डॉलरने वाढून 4.33 अब्ज डॉलर झाला आहे.
काल व्यवहारादरम्यान बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,720.8 अंकांनी किंवा 2.29 टक्क्यांनी वाढून 76,795.31 च्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. नंतर तो 76,693.36 अंकांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला, मागील सत्राच्या तुलनेत 1,618.85 अंकांनी किंवा 2.16 टक्क्यांनी वाढ झाली. बाजारातील तीन दिवसांच्या तेजीमुळे शुक्रवारपर्यंत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 28.65 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
SL/ML/SL
8 June 2024