रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

हैदराबाद, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील सर्वांत मोठ्या रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव (87) यांचे आज सकाळी हैदराबादच्या रुग्णालयात निधन झाले. रामोजी राव यांच्यावर हैदराबाद येथील स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. 5 जून रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हैदराबादमध्ये त्यांनी शेकडो एकरांमध्ये उभारलेली रामोजी फिल्म सिटीही दक्षिण आणि बॉलीवूड चित्रपटांसाठी एक मोठे व्यासपीठ आहे. येथे आतापर्यंत हजारो चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. याबरोबरच रामोजी राव हे ईनाडू या वृत्तपत्राचे संस्थापकही होते. पत्रकारिता आणि तेलुगू माध्यम विश्वात त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
रामोजी राव यांचे पूर्ण नाव चेरुकुरी रामोजी राव होते. बिझनेस आणि सिनेसृष्टीत ते मोठे नाव होते. त्यांनी स्थापन केलेला रामोजी स्टुडिओ हा जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ असल्याचे सांगितले जाते. त्यांनी रामोजी फिल्म सिटी, ईटीव्ही नेटवर्क, मार्गदर्शी चिटफंड, डॉल्फिन हॉटेल्स आणि ईनाडू तेलुगू वृत्तपत्राची पायाभरणी केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची संपत्ती 4.7 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.
रामोजी राव यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. १६ नोव्हेंबर १९३६ रोजी आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील पेडापरुपुडी गावात एका शेतकरी कुटुंबात रामोजी राव यांचा जन्म झाला.रामोजी राव यांनी जगातील सर्वात मोठे थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची स्थापना केली.
रमादेवी पब्लिक स्कूल, प्रिया फूडस, कालांजली, उषाकिरण मुव्हीज, मयुरी फिल्म डिस्ट्रिब्युटर्स आणि डॉल्फीन ग्रुप ऑफ हॉटेल्स या रामोजी राव यांनी स्थापन केलेल्या कंपन्या आहेत. रामोजी राव यांच्या निधनावर नरेंद्र मोदी यांनी दुखः व्यक्त केले. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला रामोजी राव यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली.त्यांच्या निधनाचे वृत्त क्लेशदायक आहे. त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, अशा आशयाची पोस्ट मोदींनी केली आहे.
SL/ML/SL
8 June 2024