कुटुंब – समाजाचा मूलभूत एकक….

 कुटुंब – समाजाचा मूलभूत एकक….

मुंबई, दि. 15 (जाई वैशंपायन) : व्यक्तीला जन्मानंतर मिळणारा पहिला समाज म्हणजे कुटुंब. व्याख्येनुसार पाहता- विवाहसंबंध, रक्तसंबंध, दत्तकत्वाने उत्पन्न संबंध- या बंधांनी एकत्र आलेला, बव्हंशी एका घरात राहणारा, आणि एकमेकांशी जोडीदार/पालक/अपत्य/भावंडे अशा नात्यांनी संवाद साधणारा व्यक्तिसमूह म्हणजे कुटुंब. परंतु त्यातील भावनिक, सामाजिक, शैक्षणिक असे असंख्य पैलू पाहता लक्षात येते की, कुटुंब ही अतिशय व्यापक संकल्पना आहे.

कोणत्याही परिस्थितीत व्यक्तीचे अस्तित्व सर्वार्थाने जपणारी व्यवस्था म्हणजे कुटुंब. मग ती परिस्थिती- बाल्यावस्था असो की वार्धक्य, आरोग्यपूर्ण असो की व्याधिग्रस्त, संपन्नता असो की विपन्नता, साफल्य असो की वैफल्य- अगदी टोकाच्या स्थितीतही कुटुंबच व्यक्तीची काळजी वाहते, सांभाळून घेते, पाठीशी उभे राहते.

त्याचबरोबर, कुटुंबच व्यक्तीकडून अपेक्षाही करते. कुटुंबीयांना प्रेम, वात्सल्य, आधार द्यावा, आदर करावा, समजून घ्यावे, प्रसंगी उभे राहावे, कधी कुशीत शिरावे तर कधी कुशीत घ्यावे, शिक्षण-व्यवसायादी कर्तव्ये करावीत, कुटुंबाची घडी आणि प्रतिमाही सांभाळावी, सामाजिक बांधिलकी जपावी.. अशा नाना अपेक्षा कुटुंबाला प्रत्येक व्यक्तीकडून असतात. असे एकमेकांवर अवलंबून राहता यावे, एकमेकांना जपता यावे, प्रसंगानुरूप पालक/बालक/चालक अशा कोणत्याही भूमिकेत शिरता यावे, यासाठी कुटुंबव्यवस्था उभी करण्यात आली आहे.

माणसाच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक अशा सर्व गरजांचे समाजमान्य पद्धतीने समाधान करण्यासाठी कुटुंबव्यवस्था उभी करण्यात आली आहे. त्याचवेळी भोगापेक्षा त्यागाचा संस्कार रुजावा यासाठी कुटुंबव्यवस्था उभी करण्यात आली आहे. आणि भारतात तरी ती पिढ्यानुपिढ्या अव्याहत काम करत उभी आहे.

आता सध्याच्या जगाकडे एक नजर टाकू.

विचारांमध्ये कालानुरूप होणारी स्थित्यंतरे, स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ लावून त्यासाठी वाटणारी ओढ, आर्थिक कारणाने होणारी स्थलांतरे, तर्ककठोर आणि भावनाशून्य वर्तन, व्यक्तिकेंद्रितता, बांधिलकीच्या जाणिवेची उणीव अशा विविध कारणांनी कुटुंबव्यवस्थेसमोर आह्वान उभे राहते. पाश्चिमात्य देशांतील व्यक्तिवादाच्या अतिरेकामुळे तेथे कुटुंबव्यवस्था खिळखिळी झालेली दिसते. मानवी अस्तित्वाची मूलभूत आधारभूत नातीही ‘मदर्स डे’ / ‘फादर्स डे’ अशी एक-एक दिवसापुरती तोंडदेखली साजरी होतात, ती यामुळेच.

कुटुंबाची साथ नसेल तर माणूस एकलकोंडा होत जातो, मग नैराश्य, एकटेपणा, भीती अशा नकारात्मक भावना प्रबळ होतात. मानसिक आरोग्य बिघडले की शारीरिक आरोग्यही धोक्यात येते. ते जपण्यासाठी पुन्हा कुटुंब हवेच.

सध्या नाती दुरावण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढवला आहे तो ‘सोयप्रधान’ समाजमाध्यमांनी! स्पर्शातून एखाद्या व्यक्तीला थेट जाणवणारा जिव्हाळा, एखाद्या आलंकारिक ‘पोस्ट’मधून कसा व्यक्त होईल? परंतु याचेही भान येण्यासाठी कुटुंबच हवे.

सामाजिकदृष्ट्या कुटुंबाकडे असणाऱ्या दायित्वाला आणखी काही पैलू आहेत. ते लक्षात घेऊनच, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने १९९३ मध्ये ठराव संमत करून, दरवर्षी १५ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला. ही घोषणा करण्यापूर्वी साधारण दहा वर्षांपासून, ‘विकासाच्या प्रक्रियेत कुटुंबाची भूमिका’ याविषयी संयुक्त राष्ट्रांमध्ये विचारविनिमय सुरू झाला होता. कुटुंबांना समर्पित असा एक आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी पाळला जावा, साजरा व्हावा- त्या निमित्ताने, कुटुंबव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या घटकांविषयी विचार व्हावा, अशा दिशेने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत चर्चा होऊ लागल्या होत्या. मग १९९४ हे वर्ष आंतरराष्ट्रीय कुटुंब वर्ष म्हणून पाळले गेले आणि १५ मे हा कुटुंब दिवस ठरला.

दरवर्षी या दिनासाठी एक मध्यवर्ती संकल्पना निश्चित केली जाते. तशी यावर्षीची संकल्पना ‘कुटुंबे आणि हवामानबदल’ अशी आहे. हवामान बदलाशी दोन हात करताना आवश्यक त्या मूल्यांचा आणि कृतींचा अंगीकार करणे आवश्यक आहे. या गोष्टी वर्षानुवर्षे घडत राहिल्या तरच या लढाईत सातत्यपूर्ण आणि शाश्वत यश मिळवता येईल. येथेच कुटुंबाची भूमिका महत्त्वाची ठरते. कारण मूल्ये, संस्कार, विचार आणि सवयी रुजविण्याचे तसेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्याचे कार्य कुटुंबच करत असते. जगाच्या पाठीवर कोणत्याही मानवसमूहात, सामाजिक चालीरीतींचे सातत्य राखण्यासाठी कुटुंबव्यवस्था कार्यरत असते. या अर्थाने ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरते. शिवाय, हवामानबदलाचा थेट परिणाम रोजगाराच्या आणि अन्नाच्या उपलब्धतेवर होत असल्याने, कुटुंबांवर त्याचा सखोल आणि दूरगामी परिणाम होतो. त्यामुळेही, कुटुंब आणि हवामानबदल यांचा एकत्रित विचार करणे अगत्याचे ठरते.

थोडे अधिक उंचीवर जाऊन पाहता, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या भारतीय मूल्याचे गांभीर्य येथे विशेषत्वाने लक्षात येते. आपल्याच कुटुंबीयांना कोणत्याही पद्धतीने दुखवेल अशी कोणतीच कृती आपण करत नाही. मग जर साऱ्या पृथ्वीप्रती- तिच्यावरील सर्व सजीवांप्रती जर मी ‘कुटुंबभाव’ बाळगला, तर मी साऱ्यांनाच जपेन, साऱ्यांच्या हिताचा विचार करून माझे काम करेन… मग आपोआपच माझी कृती अधिकाधिक पर्यावरणस्नेही होत जाईल. थोडक्यात, हवामान बदलासमोर दंड थोपटून उभे राहण्यासाठी, मला कुटुंबाचा- म्हणजे साऱ्या जीवसृष्टीचा आधार व्हायचेही आहे आणि तिचा आधार घ्यायचाही आहे! अशी अन्योन्य अवलंबित्वाची शाश्वती म्हणजेच तर कुटुंबभावना! या भावनेसह हवामानबदलाचा विचार करत विश्वबंधुत्वाकडे जाण्यासाठी, सर्वांना कुटुंबदिनाच्या शुभेच्छा! कुटुंब – समाजाचा मूलभूत एकक….

JW/ML/PGB
15 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *