ओबीसींच्या आरक्षणाची लूट करण्याचा कॉंग्रेसचा डाव

 ओबीसींच्या आरक्षणाची लूट करण्याचा कॉंग्रेसचा डाव

कल्याण, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेहरूंच्या काळापासून २०१४ पर्यंत कॉंग्रेसकडून अफूची गोळी घेत गरीब..गरीब… अशी माळ जपली जात असून, गरीबांचा खेळ केला गेला. तर आता ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा घाट घातला असून, देशभरातील ओबीसी, दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाची लूट करण्याचा कॉंग्रेसचा डाव आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या शहजादेंविरोधात नकली शिवसेना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने तोंडाला कुलूप आणि डोळ्यावर पट्टी बांधली आहे, अशी जोरदार टीका केली.
महायुतीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील तसेच कल्याणमधील उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान-व्हर्टेक्स येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा झाली. या सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते.

या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कल्याण लोकसभेचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजपाचे आमदार गणेश नाईक, किसन कथोरे, शिवसेनेचे विश्वनाथ भोईर, मनसेचे आमदार राजू पाटील, भाजपाचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, कुमार आयलानी, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कल्याणमधील दुर्गादेवी, तिसाई आणि अंबरनाथच्या महादेवाला प्रणाम करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत भाषण सुरू करून उपस्थित लाखो नागरिकांचे मन जिंकले.

इंडी आघाडीकडून हिंदू-मुस्लिम असा खेळ केला जात आहे. मोदींकडून हिंदू-मुस्लिम वाद केला जात असल्याचा आरोप केला जातो. पण मोदी हा खेळ खेळणाऱ्यांचा `कच्चा चिठ्ठा खोल रहा है,’ असे बोलत नरेंद्र मोदी यांनी कॉग्रेसला आव्हान दिले. आई-वडिलांची आठवण काढण्यासाठीही कॉंग्रेसवाले अल्बम उघडून पाहतात, अशी कॉंग्रेसची स्थिती आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मारला.

ओबीसी, दलित आणि आदिवासींचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्यासाठी कॉंग्रेसने कर्नाटक ही प्रयोगशाळा केली आहे. कर्नाटकात सत्ता मिळाल्यावर एका रात्रीत ओबींसीचे आरक्षण मुस्लिमांना दिले गेले. देशात अशाच पद्धतीने मुस्लिमांना आरक्षण दिले जाण्याचा डाव आहे. `वोट जिहाद’ घडविले जात आहे. मात्र, त्याचा महाराष्ट्रातील इंडी आघाडीच्या एकाही नेत्याने विरोध केला नाही, याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष वेधले. अशा कॉंग्रेसला महाराष्ट्रातील जनता मत देईल का, असा सवालही त्यांनी केला.

कॉंग्रेसकडून दहशतवादाचे समर्थन केले जात असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सांगणारेही कॉंग्रेसचा कुर्ता धरून उभे आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेनेवर केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या महानतेबाबत शहजादेंना पाच वाक्य बोलण्यास सांगावे, असे आव्हानही नरेंद्र मोदी यांनी दिले. त्याचबरोबर विकसित भारत घडविण्यासाठी पहिल्या १०० दिवसांत ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात येणार आहे. त्यात देशातील युवकांचा सहभाग असावा, यासाठी आणखी २५ दिवसांचा कालावधी वाढवून युवकांना नाविन्यपूर्ण कल्पना पाठविण्याचे आवाहन केले.

विकसित भारत घडविण्यासाठी आणि इंडी आघाडीच्या तुष्टीकरणाविरोधात भिवंडीतून कपिल मोरेश्वर पाटील तसेच कल्याणमधून शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे यांना विजयी करावे. या दोघांना दिलेले प्रत्येक मत हे मोदींच्याच खात्यात जाईल. कपिल पाटील यांनी मंत्रिमंडळात काम केले असून, ते विकासासाठी कायम कार्यरत आहेत. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या अखेरीस केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा याला निवडणुकीच्या प्रचारात उतरविले जाऊन, पाकिस्तानच्या घोषणा दिल्या गेल्या. कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळल्यावर लाज तरी कशी वाटणार, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाने विकासाचा माहौल तयार झाला असल्याचे सांगून महायुतीचा विजय होणार असल्याची ग्वाही दिली.

भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची कामे झाली आहेत.भिवंडी-कल्याणवासीयांनी महायुतीला दिलेल्या एका मताने मेट्रो, स्मार्ट सिटी, मोफत घरे अशी अनेक कामे झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भिवंडी-कल्याणचा कायापालट होत आहे, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी केले. Congress’s move to loot OBC reservation

ML/ML/PGB
15 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *