बँकांच्या नावे आलेल्या बनावट कॉल आणि संदेशांबाबत सावधान; रिझर्व्ह बँकेने दिल्या मार्गदर्शक सूचना

 बँकांच्या नावे आलेल्या बनावट कॉल आणि संदेशांबाबत सावधान; रिझर्व्ह बँकेने दिल्या मार्गदर्शक सूचना

नवी दिल्ली, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सध्या बँकेच्या नावाने बनावट कॉल किंवा संदेशाद्वारे (Fake Calls And Message) फसवणूक झाल्याचे प्रकार दररोज समोर येत आहेत. फसवणूक करणारे बँकेचे नाव घेऊन कॉल करतात किंवा संदेश पाठवून बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती विचारतात आणि फसवणूक करतात. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ग्राहकांच्या सुरक्षेसाठी फसवणूकीपासून वाचण्यासाठी सुरक्षिततेच्या सूचना अधुन मधुन सामायिक करत असते. रिझर्व्ह बँकेने (RBI) अलीकडेच मोबाइल क्रमांकाचा वापर करुन होणार्‍या नवीन फसवणूकीबाबत इशारा दिला होता. त्यानुसार बँका किंवा वित्तीय संस्थांच्या टोल फ्री क्रमांकासारख्या मोबाइल क्रमांकावरून फसवणूक केली जात आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले होते की फसवणूक करणारे वित्तीय संस्थांच्या टोल फ्री क्रमांकासारखे मोबाइल नंबर घेतात आणि ट्रू कॉलरसारख्या अ‍ॅपवर संस्थेच्या नावाने नंबर सेव्ह करतात.
भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा नवा इशारा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या ट्विटर हँडलद्वारे सांगितले आहे की ग्राहकांनी आपला पिन क्रमांक, ओटीपी आणि बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती सामायिक करू नये. मध्यवर्ती बँकेने असे म्हटले आहे की जर एखाद्या ग्राहकाचे कार्ड चोरीला गेले किंवा हरवले तर ताबडतोब ते कार्ड ब्लॉक करा. याशिवाय कोणत्याही प्रकारच्या केवायसी तपशीलाशी संबंधित माहिती मागितल्यास ग्राहकांनी सतर्क असले पाहिजे आणि अशी माहिती कोणाबरोबरही सामायिक करू नये.
अलीकडेच रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकेच्या नावे येणार्‍या फसवणूकीचे फोन कॉल (Fake Calls) संदर्भात इशारा दिला होता. केंद्रीय बँकेने म्हटले आहे की समजा बँकेतून येणार्‍या फोन कॉलचा क्रमांक 1600-123-1234 आहे. तर फसवणूक करणारे 600-123-1234 प्रमाणेच एक क्रमांक घेतात आणि तो ट्रुकॉलर किंवा अन्य सेवा देणार्‍या ऍपवर बँकेचा टोल फ्री क्रमांक म्हणून नोंदणी करतात. यामुळे, हा कॉल बँक अथवा वित्तीय संस्थेचा आहे की एखाद्या फसव्या व्यक्तीने केलेला कॉल आहे हे लोकांना समजत नाही.
रिझर्व्ह बँकेने सांगितले की कोणतीही वित्तीय संस्था किंवा त्यांचे प्रतिनिधी ईमेल, एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप संदेश पाठवत नाहीत किंवा वैयक्तिक माहिती, पासवर्ड किंवा ओटीपी विचारण्यासाठी फोनवर कॉल करीत नाहीत हे समजून घेणे आवश्यक आहे. अशाप्रकारच्या ईमेल, एसएमएस, व्हॉट्सअ‍ॅप संदेश किंवा फोन कॉलला कधीही प्रतिसाद देऊ नका. ग्राहकांनी कधीही कार्डच्या सत्यापनासाठी एसएमएसद्वारे प्राप्त झालेल्या लिंकवर क्लिक करू नये. ग्राहकांनी नेहमी आपल्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे बँकेच्या संपर्क तपशीलांपर्यंत पोहोचले पाहिजे आणि अडचणींसंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी सुरक्षित माध्यमांचा वापर केला पाहिजे.
 
PL/KA/PL/23 FEB 2021

mmc

Related post