ईपीएफवर लागू झालेल्या कराचा सेवानिवृत्ती योजनेवर होणार परिणाम

 ईपीएफवर लागू झालेल्या कराचा सेवानिवृत्ती योजनेवर होणार परिणाम

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नोकरी करणार्‍यांना कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (EPF) मधील गुंतवणूक अधिक आकर्षक राहिली आहे. यात गुंतवणूक केल्यावर 1.50 लाख रुपयांपर्यंत कर सवलतीसह अधिक व्याज मिळते. अशा परिस्थितीत जास्त उत्पन्न असलेले कर्मचारी त्यात गुंतवणूक करून दुहेरी फायदा घेत असतात. परंतु यावर्षीच्या अर्थसंकल्पात (Budget) सरकारने त्यात गुंतवणूकीसाठी काही मर्यादा निश्चित केल्या आहेत. या अंतर्गत वर्षाकाठी अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूकीवर मिळणारे उत्पन्न म्हणजेच व्याज करपात्र असणार आहे. अशा परिस्थितीत ती कमी आकर्षक होईल आणि नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) अधिक फायदेशीर ठरेल.

ईपीएफ म्हणजे काय

संघटित क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठीचा हा निवृत्ती निधी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO) त्याचे संचालन करते. त्याअंतर्गत कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांच्या मुळ वेतनाच्या 12 टक्के रक्कम कापून ईपीएफमध्ये जमा करतात. तेवढीच रक्कम कंपन्या देखील त्यांच्या वतीने जमा करतात. कंपन्यांच्या योगदानातील 8.33 टक्के रक्कम कर्मचारी भविष्यनिर्वाह योजनेत (EPS) जाते ज्यावर कोणतेही व्याज मिळत नाही. उर्वरित 3.67 टक्के रक्कम ईपीएफ (EPF) मध्ये जाते. ही रक्कम आणि कर्मचार्‍याने दिलेल्या योगदानावर वार्षिक व्याज मिळते. गेल्या दशकात ईपीएफ वर आठ ते नऊ टक्के व्याज मिळत आहे.

स्वैच्छिक पीएफ (VPF) काय आहे

ईपीएफमध्ये कर्मचार्‍याच्या मुळ वेतनाचा निश्चित केलेला हिस्सा आणि तेवढीच रक्कम जमा करणे बंधनकारक आहे. यात 1.50 लाखांपर्यंतच्या गुंतवणूकीवर करात सूट आहे. परंतु अनेक कर्मचारी 12 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम ईपीफ मध्ये जमा करतात, ज्यास्ला स्वैच्छिक पीएफ म्हणजेच व्हीपीएफ (VPF) म्हणतात. या अतिरिक्त रकमेवर करात सूट मिळत नाही, परंतु ईपीएफच्या जास्त व्याजाचा निश्चितच फायदा मिळतो. आता यात 2.50 लाख रुपयांहून अधिक योगदानानंतर मिळणार्‍या फायद्यावर कर भरावा लागेल.

ईपीएफवर तिहेट सूट

अर्थसंकल्पापूर्वी, ईपीएफ (EPF) काही निवडक गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये समाविष्ट होता ज्यात गुंतवणूक, व्याज आणि मूदत संपल्यानंतर मिळणारी रक्कम म्हणजेच तीन स्तरांवर करात सूट होती. अर्थसंकल्पात 1.50 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत कायम ठेवण्यात आली आहे. परंतु 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या गुंतवणूकीवर मिळणारे उत्पन्न कराच्या टप्प्यात आणले गेले आहे.

या गुंतवणूकदारांचे होणार नुकसान

अर्थसंकल्पात ईपीएफवरील (EPF) करामध्ये बदल झाल्यामुळे ज्यांचे पगार 20.80 लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहेत त्या गुंतवणूकदारांचे नुकसान होणार आहे. एखाद्याचा पगार वर्षाकाठी 30 लाख रुपये असेल तर 12 टक्के योगदानानुसार 3.60 लाख रुपये ईपीएफमध्ये जातील. अशा परिस्थितीत 1.10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर त्याला कर भरावा लागेल.
PL/KA/PL/11 FEB 2021
 

mmc

Related post