१८ जूनला होणार PM किसानच्या १७ व्या हप्त्यांचे वितरण

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण आणि ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम-किसान (PM-KISAN) योजनेअंतर्गत सुमारे 20 हजार कोटी रुपयांचा १७ वा हप्ता जारी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जून रोजी वाराणसीला भेट देणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता वितरीत करतील
त्याचबरोबर यावेळी पंतप्रधान 30 हजार पेक्षा जास्त बचत गटांना कृषी सखी म्हणून प्रमाणपत्रे प्रदान करतील. उत्तर प्रदेश सरकारच्या सहयोगाने केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, हा कार्यक्रम आयोजित करणार आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्र्यांसह इतर मान्यवर यावेळी उपस्थित राहतील.
पत्रकार परिषदेदरम्यान, केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण आणि ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी आपल्यावर सोपवल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. ते म्हणाले की विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी शेती हा सर्वात महत्त्वाचा आधार आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया असून, आजही रोजगाराच्या अनेक संधी शेतीतून निर्माण होत असल्याचे ते म्हणाले.
केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्री म्हणाले की आज देशातील धान्याचे भांडार शेतकरी भरत आहेत. यापूर्वीही कृषी आणि शेतकरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक पावले उचलली गेली आणि आताही पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, पंतप्रधानांनी सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान निधीचा 17 वा हप्ता जारी केला.
चौहान म्हणाले की तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या कार्यक्रमात, पंतप्रधान वाराणसी येथून एक बटण क्लिक करून पीएम किसान योजने अंतर्गत 9.26 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा बहुप्रतीक्षित 17 वा हप्ता वितरित करतील. सरकारने आतापर्यंत या योजनेअंतर्गत देशभरातील 11 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 3.04 लाख कोटी रुपयांचे वितरण केले आहे. आता जारी केल्या जाणाऱ्या रकमेसह, योजनेच्या प्रारंभापासून लाभार्थ्यांना हस्तांतरित केलेली एकूण रक्कम 3.24 लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचेल.
ML/ML/SL
15 June 2024