धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करणारच …
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या निविदेतील अटी शर्तीनुसार ज्यांची आर्थिक क्षमता आहे त्यालाच हे काम करता येईल त्यामुळे अडाणी समूहाने ते सिध्द केल्यानंतरच त्यांना कामाचे आदेश देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.
यासंदर्भातील लक्षवेधी सूचना वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केली होती, त्यावर सुनील केदार, जयंत पाटील यांनी उप प्रश्न विचारले होते. या कामाच्या कंत्राटदाराने विविध विभागांच्या परवानगी घ्यायच्या आहेत त्यापैकी नगर विकासाची परवानगी अद्याप बाकी आहे, अडाणी समूहाच्या खात्यात आवश्यक पैसे जमा आहेत की नाही हे पाहूनच त्यांना कामाचे आदेश देण्यात येतील असं फडणवीस म्हणाले.
रेल्वे विभागाची जागा पैसे देऊन ताब्यात घेतली आहे, त्यामुळेच तिथे आधी पुनर्वसन करून मगच इतर विकास कामे करण्यात येणार आहेत, म्हणूनच कोणत्याही अडचणी येऊन न देता धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण केला जाईल, त्यासाठी सुमारे सात वर्षांचा कालावधी लागेल असंही फडणवीस म्हणाले.
खोट्या कागदपत्रांच्या आधारे वैद्यकीय प्रवेश
मायणी , तालुका खटाव ,जिल्हा सातारा येथील रुरल इन्स्टिट्युट या मेडिकल महाविद्यालयात नापास विद्यार्थ्यांची खोटी कागदपत्रे तयार करून त्यांना वैद्यकीय प्रवेश दिल्याकामी तेथील उपविभागीय पोलिस अधिकारी आणि तपास अधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
याबाबतची लक्षवेधी सूचना जयकुमार गोरे यांनी उपस्थित केली होती, यात प्रमुख आरोपीची योग्य चौकशी केली नाही , कमजोर आरोप पत्र तयार करण्यात आलं, प्रत्यक्ष साक्षीदाराने सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केलं अशा घटना उघडकीस आल्या आहेत त्यामुळे ही कारवाई केली जात आहे असं ते म्हणाले.
उपविभागीय अधिकारी निलंबित
जळगाव जिल्ह्यातील बोदवड इथे जलचक्र खुर्द मधील खोदकाम प्रकरणी तसेच गौण खनिज चोरी प्रकरणात तेथील उपविभागीय अधिकारी यांना निलंबित करून त्यांची चौकशी विभागीय आयुक्तांकडून चौकशी करण्याची घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली, याबाबतची लक्षवेधी सूचना चंद्रकांत निंबा पाटील यांनी उपस्थित केली होती.
ML/KA/SL
21 March 2023