नाशिकमधील धरणे भरली, मराठवाड्याला पाणी मिळणार

 नाशिकमधील धरणे भरली, मराठवाड्याला पाणी मिळणार

नाशिक, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर आणि गंगापूर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने अहमदनगर आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पाण्याचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे.

नांदूर मध्यमेश्वर धरणातून विसर्ग आज 1 वाजता 300 क्यूसेक्स होता. दुपारी 3 वाजता 1314 क्यूसेक ने वाढवून एकूण 1614 क्यूसेक करण्यात आला. तर गंगापूर धरण विसर्ग आज दुपारी 1 वाजता 520 क्यूसेक्स होता, दुपारी 2 वाजता 520 क्यूसेक ने वाढवून एकूण 1040 क्यूसेक करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यात पावसाने अखेर गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्हाभरात जोरदार कमबॅक केल्याने अनेक ठिकाणी सखल पाणी साचले. यामुळे जिल्ह्यातील पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता असल्याने बळीराजा सुखावला आहे. आणखी काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास जिल्ह्यातील उर्वरित धरणे भरतील आणि पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल असे बोलले जात आहे.

नाशिक शहरासह ग्रामीण भागातही मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे पाण्याअभावी मान टाकू लागलेल्या पिकांनाही या पावसामुळे जीवदान मिळण्याची आशा आहे. गुरुवारी रात्रीपासून पावसाने सुरुवात केली. यामुळे खरीप पिकांसाठी तो लाभदायक आहे. दुबार पेरणीचे संकटही यामुळे टळले आहे. जिल्ह्यात शनिवारपर्यंत हवामान विभागाने यलो अलर्टचा इशारा दिला आहे.

गेल्यावर्षी सप्टेंबरपर्यंत गोदावरीला किमान तीन ते चार पूर आले होते.रामसेतू पुलावरून पाणी गेले होते. मात्र या वर्षी गोदेला अजून एकही पूर आलेला नाही. आणखीन काही दिवस हा पाऊस असाच राहिल्यास गोदावरी तसेच जिल्ह्यातील सर्व नदी नाले दुथडी भरून वाहू लागतील असे हवामान विषयक तज्ञांना वाटत आहे.

पुढील दोन दिवस पावसाचे

नाशिक जिल्ह्यासाठी गुरुवार ते शनिवारपर्यंत हवामान खात्याकडून यलो अलर्ट दर्शविण्यात आला आहे. जिल्ह्यातील काही भागात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची सुरवात झाली आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचे असणार असून गुरुवारी जिल्ह्यासाठी यलो अलर्ट दिला होता. शुक्रवार आणि शनिवारीदेखील हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानुसार गुरुवारी रात्रीपासून पावसाने सुरवात केल्यानंतर आज सकाळपर्यंत पावसाची संततधार सुरूच आहे. पुढील तीन ते चार दिवस हे पावसाचे राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहे. Dams in Nashik filled, Marathwada will get water

ML/KA/PGB
8 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *