अल्पवयीन मुलीची धर्मांतर करून परराज्यात विक्री
यवतमाळ, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अल्पवयिन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यांच्याविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यामध्ये काहीवेळा पालकही सहभागी असल्याच्या घटना समोर आल्याने पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाह सर्रास होत असल्याचे दाहक वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित करणारी एक गंभीर घटना उघडकीस आल्याने राज्यभर खळबळ माजली आहे. अकोला येथील एका अल्पवयीन मुलीची धर्मांतर करून तिचा राजस्थानातील तरुणाशी यवतमाळात विवाह लावून देत एक लाख रुपयांत विक्री करण्यात आली. मुलीची आई व मामाने संगनमताने मुलीची विक्री केली. काही व्यक्ती या मुलीस धामणगाव रेल्वे मार्गे राजस्थानला घेवून जात असताना यवतमाळ शहर पोलिसांनी अल्पवयीन मुलीची सुटका करून आंतराज्यीय टोळीला जेरबंद केले. याप्रकरणी मुलीची आई, मामा व राजस्थानातील चौघे, अशा सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास शहरातील धामणगाव चौफुली येथे करण्यात आली.
एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्या इच्छेविरुद्ध राजस्थानातील शंकरसिंह सोहनसिंह (२८, रा. सोहनसिंह वार्ड क्रं. ७, करनीजी टेंपल, तारानगर, जि. चुरू, राजस्थान) याच्याशी यवतमाळातील मोमीनपुरा भागात एका घरी लग्न लावून देण्यात आले. या मुलीस शुक्रवारी सायंकाळी काही व्यक्ती खासगी टेम्पोने धामणगाव रेल्वे मार्गे राजस्थानात नेत असल्याची गुप्त माहिती यवतमाळ शहर पोलिसांना मिळाली.
अल्पवयीन मुलीस विश्वासात घेवून विचारपूस केली असता, तिची आई इम्तीयाजबी सरदारखॉ पठाण (५०, रा. शिवणी, मच्छी मार्केट अकोला) व टेम्पोचालक असलेला मामा अस्लमखॉ तस्वरखॉ पठाण यांनी एक लाख रुपयात तिला शंकरसिंह सोहनसिंह याला विकले व मामाने त्याच्या मोमीनपुरा, यवतमाळ येथील घरात या दोघांचा विवाह लावून दिल्याचे सांगितले. त्यासाठी आईचे व तिचे बनावट आधारकार्ड तयार करण्यात आले, अशी धक्कादायक माहिती मुलीने पोलिसांना दिली.
यात सत्तार मोहम्मद बैजीरदीन लोहार, ताज मोहम्मद बैजीरदीन लोहार, अब्दुल कमरूद्दीन भडमुन्जा यांनी दलाली केल्याचा आरोप मुलीने केला आहे. या तिघांनी तिच्या आईचे हिंदूधर्मीय असल्याचे बनावट आधारकार्ड तयार करून, तिचे नाव कविता दीपक अग्रवाल असल्याचे नमूद केले. बनावट आधार कार्डवर मुलीचे नाव कविता दीपक अग्रवाल असे नोंदविले.
या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल रावसाहेब दामोदर शेंडे यांनी यवतमाळ शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यावरून पोलिसांनी शंकरसिंह सोहनसिंह (२८, रा. सोहनसिंह वार्ड न. ७, करनीजी टेंपल, तारानगर, जि. चुरू, राजस्थान), सत्तार मोहम्मद बैजीरदीन लोहार (४०, रा. वार्ड नं. १२, तारानगर, जि. चुरू, राजस्थान), ताज मोहम्मद बैजीरदीन लोहार (४०, रा. बजीरदीन वार्ड नं. ११, जोगीवाला, ता. भादरा, जि. हनुमानगढ, राजस्थान), अब्दुल कमरूद्दीन भडमुन्जा (४९, रा. वार्ड नं.७, तारानगर, जि. चुरू, राजस्थान), अस्लमखॉ तस्वर खॉ पठाण (३२, रा. गळवा, ता. बाभूळगाव, जि. यवतमाळ) आणि ईम्तीयाजबी सरादर खॉ पठाण (५०, रा. शिवणी, मच्छी मार्केट, अकोला) यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. यवतमाळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भास्कर दरणे हे करत आहेत.
SL/ML/SL
4 May 2024