भारतात सोन्याची तस्करी करणाऱ्या अफगाणिस्तानच्या डिप्लोमॅटवर गुन्हा दाखल

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिलांच्या साज शृंगार मोठे महत्त्व असलेल्या सोन्याचा मोह भल्याभल्यांना सुटत नाही. अशीच एक सोन्याच्या मोहाची अजब घटना उघडकीस आली आहे. भारतात उपस्थित असलेल्या अफगाणिस्तानच्या राजनैतिक महिला अधिकारीला मुंबई विमानतळावरून 25 किलो सोन्याची तस्करी करताना पकडण्यात आले आहे. अफगाणिस्तानच्या कॉन्सुल जनरल झाकिया वर्दाक दुबईतून भारतात 18.6 कोटी रुपयांचे सोने तस्करी करण्याचा विचार करत होत्या. त्यांनी कपड्यात सोन्याचे दागिने लपवले होते. 25 एप्रिल रोजी या मुत्सद्दीला विमानतळावर पकडण्यात आले होते. मात्र, त्याची माहिती आता समोर आली आहे. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सोने जप्त करण्यात आले आहे.

अहवालानुसार, सीमा शुल्क कायदा 1962 अंतर्गत एखाद्या व्यक्तीकडून जप्त केलेल्या सोन्याची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यास, त्याला तात्काळ अटक केली जाते आणि फौजदारी गुन्हा दाखल केला जातो. मात्र, वर्दाक यांच्याकडे अफगाणिस्तानने जारी केलेला डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहे. डिप्लोमॅटिक इम्युनिटीमुळे त्यांना सध्या अटक झालेली नाही.

माध्यमांशी बोलताना वर्दाक म्हणाल्या, “हे आरोप ऐकून मला धक्का बसला आहे. मी अफगाणिस्तानच्या वाणिज्य दूतावासात काम करते. सध्या मी वैद्यकीय गरजांमुळे मुंबईत नाही.” अहवालानुसार, महसूल गुप्तचर संचालनालयाला (डीआरआय) त्यांच्या सूत्रांकडून या प्रकरणाची माहिती मिळाली होती. त्यांना पकडण्यासाठी डझनभर पोलीस तैनात करण्यात आले होते.

58 वर्षीय झाकिया 25 एप्रिल रोजी संध्याकाळच्या फ्लाइटने आपल्या मुलासह मुंबईला परतली. या दोघांनी विमानतळाबाहेर पडण्यासाठी ग्रीन चॅनलचा वापर केला. याचा अर्थ असा की त्यांच्याकडे असा कोणताही माल नाही ज्याची सीमाशुल्क विभागाने तपासणी करणे आवश्यक आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांना एक्झिट गेटवर थांबवले.

अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अश्रफ घनी यांच्या सरकारच्या काळात झाकिया वर्दाक यांची भारतातील पहिली महिला मुत्सद्दी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तालिबानने ऑगस्ट २०२१ मध्ये घनी सरकारची हकालपट्टी करून अफगाणिस्तानचा ताबा घेतला. काही महिन्यांपूर्वी भारतातील अफगाणिस्तानचा दूतावास बंद करण्यात आला होता. मात्र, भारतीय दूतावास अफगाणिस्तानमध्ये आपली सेवा देत आहे.

SL/ML/SL

4 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *