‘छावा’ चित्रपटाचा टिझर रिलीज
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनसंघर्ष उलगडणाऱ्या ‘छावा’ या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट यावर्षी 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. छोट्या टीझरमध्ये विकीचा कधीही न पाहिलेला अवतार पाहायला मिळाला आहे. त्याचा शंभूराजांच्या वेशभूषेतील आवेशपूर्ण लूक सगळ्यांनाच भावला आहे. विकीच्या कारकिर्दीतील हा पहिलाच पीरियड ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचा टीझर स्वत: विकीने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
विक्की कौशलबरोबरच या सिनेमात अभिनेत्री रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, मराठी अभिनेता संतोष जुवेकरही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अभिनेता विक्की कौशल छावा सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भुमिकेत आहेत. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाईंच्या भुमिकेत दिसणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन हे लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. 6 डिसेंबर 2024 रोजी छावा सिनेमा रिलीज होणार आहे.
SL/ML/SL
19 August 2024