चांद्रयान -३ करणार हा जागतिक विक्रम

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेले चांद्रयान- ३ आता काही तासांतच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.ही महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडत असताना चांद्रयान-३ एक जागतिक विक्रमही प्रस्थापित करणार आहे. चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड होणार आहे. अद्याप कोणत्याही देशानं या ठिकाणाबाबतच फार निरीक्षण केलेलं नाही.ही मोहिम यशस्वीरित्या पार पडल्यास भारत ही किमया करणारा पहिला देश ठरणार आहे.
चंद्र आजपर्यंत जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांसाठी एक आकर्षणाचा विषय ठरला आहे. येथील असमान जमीन, तिथं असणाका काळोख या सर्व गोष्टी आव्हानांमध्ये आणखी भर टाकत असतात. शिवाय ज्यावेळी चंद्रावर रात्र होते तेव्हा येथील दक्षिण ध्रुवावर तापमान उणे 230 अंशांपर्यंत जातं. ज्यामुळं हा भूभाग कमालीचा दुर्मिळ आणि तितकाच भारावणारा असल्याचं म्हटलं जातं. इथं बराच खनिजसाठा असल्याचंही सांगितलं जातं.
चंद्र आणि त्याहूनही विज्ञान, संशोधनामध्ये अभिरुची असणाऱ्यांसाठी चंद्राचा दक्षिण ध्रुव कायमच आकर्षणाचा विषय राहिला आहे. तेव्हा आता भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेला यश मिळतं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. कारण, याच माध्यमातून चंद्राचा एक महत्त्वाचा भाग संपूर्ण जगासमोर येणार आहे.
चंद्राचा दक्षिण ध्रुव इतका खडबडीत आहे तर मग तिथं चांद्रयान उतरवण्याची का धडपड सुरू आहे, असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. तर आजवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे या मोहिमेतून काहीतरी नवं सापडेल, असं मानलं जात आहे.या भागाचा मोठा प्रदेश सूर्याच्या सावलीत असतो आणि सूर्यकिरणं कमी प्रमाणात पोहोचल्यामुळे हा प्रदेश अत्यंत थंड झाला आहे. त्यामुळे कायम अंधारात असणाऱ्या या प्रदेशात पाण्याचे अंश किंवा खनिजं असतील असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. नुकत्याच झालेल्या काही चांद्रमोहिमांमधून त्यावर थोडंफार संशोधनही झालं आहे. जर त्यावर अधिक संशोधन झालं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा शोध लागला तर भविष्यात माणसाला ते फायदेशीर ठरेल.
SL/KA/SL
21 Aug 2023