धानाला बोनस नागपूर अधिवेशनात, ई पीक पहाणीला मुदतवाढ

 धानाला बोनस नागपूर अधिवेशनात, ई पीक पहाणीला मुदतवाढ

भंडारा, दि. २० ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : भंडारा जिल्ह्यातील धान हे प्रमुख पीक आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धानाला बोनस देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्याने काम करते आहे. त्यामुळे नागपूर येथे होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात धानाला बोनस जाहीर करू, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. शासन आपल्या दारी
अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम चैतन्य पोलीस मैदान, भंडारा येथे आयोजित करण्यात आला होता. जिल्हाभरातून उपस्थित लाभार्थ्यांना संबोधित करतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री डॅा.विजयकुमार गावित, खा.सुनील मेंढे, आ.नरेंद्र भोंडेकर, आ.राजु कारेमोरे, उपस्थित होते. धान हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धानाला बोनस जाहीर करावे, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून केली होती. त्यानुसार येत्या नागपूर अधिवेशनात बोनस जाहीर करण्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा धान जलदगतीने खरेदी होणे आवश्यक आहे. त्यासाठी सध्या सुरु असलेली खरेदी केंद्रे पुरेशी नसल्याने उर्वरीत केंद्र सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास दिले. शेतकऱ्यांच्या पिकांचा ई-पीक पाहणी कार्यक्रम राबविला जात आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता यावी, यासाठी भंडारा जिल्ह्यात पीक पाहणीच्या कार्यक्रमास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा देखील यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

समृध्दी महामार्ग भंडारा, गोंदिया, गडचिरोलीपर्यंत आपण वाढवितो आहे. या मार्गाच्या डीपीआरचे काम गतीने होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भंडारा नैसर्गिक वैविध्यता लाभलेला जिल्हा आहे. पर्यटनवाढीला या जिल्ह्यात मोठा वाव आहे. जिल्ह्यात पितळ उद्योग क्लस्टर उभारण्याची मागणी होत आहे. जिल्ह्याच्या पर्यटनासह उद्योग वाढीसाठी आवश्यक त्या बाबी करण्यास शासन कटीबद्ध आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्यभर शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपण राबवितो आहे. सर्वसामान्य गरीब लाभार्थ्यांना त्यांच्या दारी जावून योजना बहाल करण्याचा हा कार्यक्रम असून राज्यात 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना कार्यक्रमाने थेट लाभ मिळवून दिला आहे.
सर्वसामान्य शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर कामे केली जात आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण केवळ एक रुपया भरून पिकविम्याचा लाभ देण्याची योजना सुरु केली. लाखो शेतकऱ्यांच्या पिकाला या योजनेने संरक्षण दिले.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण नमो शेतकरी सन्मान योजना सुरु केली. केंद्र शासनाने 6 हजार आणि राज्य शासनाच्या योजनेचे 6 हजार असे 12 हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांना दिले जात आहे. अशा प्रकारची योजना राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देऊ

 शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा पुरेशी वीज मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसह सर्वच स्तरावरून ही मागणी होत आहे. त्यामुळेच आपण मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना सुरु केली. येत्या काही दिवसात कृषीफिडर सौरऊर्जेवर टाकून शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

एक हजार 954 कोटींच्या अग्रीमाचे वाटप

यावर्षीपासून आपण महत्वाकांक्षी सर्वसमावेशक पीकविमा योजना सुरु केली. योजनेंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यभर अग्रीम रक्कमेचे वाटप केले जात आहे. नुकसान भरपाईसाठी 47 लाख 63 हजार अर्जांना मंजूरी देण्यात आली असून आतापर्यंत 965 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेसाठी यावर्षी पहिल्यांदाच 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शून्य टक्के व्याजाने पीककर्ज, पुरग्रस्तांना दुप्पटीने आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. भंडारा जिल्ह्यात धान पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. शेतकऱ्यांनी धानासोबतच नगदी पिके देखील घेतली पाहिजे. भंडारा येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी मागणी होती, ती पूर्ण करण्यात आली आहे. लवकरच निविदा काढून महाविद्यालयाचे बांधकाम सुरु केले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

यावेळी विविध योजनेच्या 27 लाभार्थ्यांना विविध लाभाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते वितरण करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील 168 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमस्थळी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध नामांकित कंपन्यांच्यावतीने त्यांच्याकडील रिक्त 1 हजार 500 जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीद्वारे निवड झालेल्या निवडक उमेदवारांना मुख्यमंत्र्यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

कार्यक्रमस्थळी विविध शासकीय विभागाचे स्टॅाल लावण्यात आले होते. सर्वसामान्य नागरिकांना आपले निवेदन, तक्रार, म्हणणे सादर करता यावे यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाच्यावतीने स्वतंत्र दालन लावण्यात आले. रोजगार मेळाव्यात अनेक युवकांनी मुलाखती देऊन रोजगाराच्या संधीचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी आलेल्या लाभार्थ्यांना नास्ता, पाणी, भोजन , प्रवासाची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने विनामुल्य करण्यात आली होती. कार्यक्रमास आलेल्या लाभार्थ्यांना प्रदर्शनस्थळी विविध योजनांची माहिती देण्यात आली.

ML/KA/SL

20 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *