चिंचवडमध्ये भाजपची बाजी

पुणे, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील कसबा विधानसभा पोट निवडणूकीत धक्कादायक पराभव पत्कराव्या लागलेल्या भाजपने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत मात्र बाजी मारली आहे. या निवडणूकात भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या विजयी ठरल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना काटे यांचा ३६ हजार ७० मतांनी पराभव केला आहे. या विजयामुळे भाजपने अजित पवार यांच्या चिंचवडमधील वर्चस्वाला थेट आव्हान दिल्याचे मानले जात आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी ही निवडणूत फारच प्रतिष्ठेची केली होती. आहे. या एका जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रचाराच्या मैदानात उतरले होते. मविआचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे राष्ट्रवादीच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे दिसून येत आहे.
मविआला राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा मोठा फटका बसला त्यामुळेच नाना काटे यांचा पराभव झाला अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी देखील दिली आहे. जर ही बंडखोरी थोपवण्यास मविआला यश आलं असतं तर या जागेवर मविआचा उमेदवार नक्कीच विजयी झाला असता, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान आजच जाहीर झालेल्या कसबा पोट निवडणूकीमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला असून कॉग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी ठरले आहेत. त्यामुळे तब्बल तीन दशकांनंतर भाजपला बालेकिल्ला असलेला कसबा कॉग्रेसच्या हाती गेला आहे.
SL/KA/SL
2 March 2023